फायर सेफ्टी

आगीच्या घटना सतत कोठे ना कोठे घडताना दिसून येतात. मग जंगलातील वणवा, गॅस सिलिंडर स्फोट, शॉटसर्किट असो किंवा मानवी निष्काळजीपणा असो, या कारणांमुळे आगीच्या घटना घडताना दिसून येतात. मात्र, त्यावर नियंत्रण मिळवण्यसाठी सक्षम यंत्रणा नसल्याचे त्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. 12 फेब्रुवारी रोजी दिल्लीतील करोलबाग येथे हॉटेल अर्पित येथे भीषण आगीत 17 जणांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेपाठोपाठ बंगळूरच्या येलहंका विमानतळावर आयोजित एरो शोदरम्यान पार्किंगमध्ये भडकलेल्या आगीत सुमारे 300 हून गाड्या जळून खाक झाल्या. या घटनांवरून आगप्रतिबंधक यंत्रणावरून सरकारची उदासिनता समोर आली आहे.

देशातील बहुसंख्य हॉटेलप्रमाणेच दिल्लीतील हॉटेल अर्पितमध्ये आग लागल्यानंतर त्याला विझवण्यासाठी पुरेशी यंत्रणा कार्यान्वित नसल्याचे आगीच्या निमित्ताने उघडकीस आले आहे. अर्पित हॉटेलच्या गेस्ट हाऊस आणि बाहेर पडण्यासाठी वेगळा रस्ता असणे गरजेचे आहे. मात्र, अशी कोणतीही व्यवस्था तेथे नव्हती. एवढेच नाही तर सर्व खिडक्‍या या एसीमुळे पॅक होत्या आणि जाम झाल्या होत्या. त्यामुळे अनेकांचा धुराने गुदमरून मृत्यू झाला. अर्पित हॉटेलला शॉटसर्किटमुळे आग लागली आणि तेथे सुरक्षेकडे लक्ष दिले गेले नाही. दिल्लीतील आगीची घटना ताजी असतानाच 20 ते 24 फेब्रुवारीपर्यंत बंगळूरच्या येलहंका एअरबेसवर आयोजित एरो इंडिया शोदरम्यान पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांना अचानक आग लागली. सुरवातीला आग लागल्याचे कोणाच्याच लक्षात आले नाही. आकाशात जेव्हा काळ्या धुराचे लोट येऊ लागले, तेव्हा पार्किंगमध्ये काहीतरी गडबड झाल्याचे लक्षात आले आणि तेथे धावपळ उडाली. तोपर्यंत शेकडो गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. पार्किग स्थळावर असलेल्या गवतामुळे आग लागली. ती आग वाऱ्यामुळे वेगाने पसरली आणि ती आग पार्किंग एरिया क्रमांक पाचमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांपर्यंत गेली. घटनास्थळी आग विझवण्याची यंत्रणा पोचेपर्यंत म्हणजेच बंब येईपर्यंत 300 गाड्या जळाल्या होत्या. सुदैवाने यात प्राणहानी झाली नाही.

एरो शोसारखा मोठा इव्हेंट आयोजित केलेला असताना तेथे आगीसारख्या दुर्घटनेला सामोरे जाण्यासाठी पुरेशी यंत्रणा सक्षम नसल्याचे आश्‍चर्य व्यक्त केले गेले. ही घटना निष्काळजीपणातून घडल्याचे प्राथमिक चौकशीतून सांगितले जात आहे. कारण एखाद्या व्यक्तीने जळती सिगारेट गवतात फेकून दिल्याने आग लगेच भडकली आणि ती पार्किंगपर्यंत पसरली, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे.

अलीकडेच इंडिया रिस्क सर्व्हेनुसार, व्यवसायासाठी आग हा सर्वात मोठा धोका मानला जातो. 2016 रोजीच्या सर्व्हेक्षणात हा धोका आठव्या स्थानावर होता. सर्व्हेक्षणानुसार सुरक्षा निकषांकडे दुर्लक्ष करणे आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या तसेच आवश्‍यक उपकरणांची कमतरता या गोष्टी अशा घटनांना जबाबदार धरले जाते. सरकार आणि अन्य संस्थांनी फायर सेफ्टीसंबंदी अनेक नियम तयार केले आहेत. मात्र, या नियमांचे पालन करण्यासंदर्भात देखरेख करण्यासाठी अद्याप कोणतीही यंत्रणा विकसित झालेली नाही. म्हणूनच बहुतांश सार्वजनिक ठिकाणी फायर सेफ्टीवरून निष्काळजीपणा दिसून येतो. बहुसंख्य इमारतींना फायर नो ऑब्जेक्‍शन सर्टिफिकेट घेतले गेलेले नसते. जरी प्रमाणपत्र घेतले असेल तर ते कोणत्याही क्षेत्रातील असू शकते किंवा ते सेफ्टीच्या निकषावर उतरलेले असेलच असे नाही.

2017 मध्ये देशातील आग प्रतिबिंधक यंत्रणेसंदर्भात गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 2012 मध्ये देशात 8559 फायर स्टेशनची गरज आहे, तर त्याप्रमाणात भारतात केवळ 2987 फायर स्टेशन आहेत. म्हणजेच फायरस्टेशनची संख्या 65 टक्कयांपेक्षा कमी आहे. त्याचवेळी देशात 5 लाख 59 हजार 681 प्रशिक्षित फायर फायटर्स, 2 लाख 21 हजार 411 फायर फायटिंग उपकरण आणि 9 हजार 337 अग्निशमन वाहनांची गरज आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात यंत्रणेत त्रुटी आणि कमतरता असल्याने आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्याची अपेक्षा ठेवणे चुकीचेच आहे. सात वर्षापूर्वीची ही स्थिती असली तरी सध्या 2019 मध्ये यात खूप मोठा बदल झाला असेल, असे वाटत नाही. आगीच्या घटनांना पायबंद बसवण्यास सक्षम यंत्रणा नसल्याने 2015 मध्ये सुमारे 17 हजार 700 जणांचे जीव गेले होते. याचाच अर्थ दररोज सरासरी 48 जणांचा मृत्यू होतो आणि हे मृत्यू रोखता येणे शक्‍य आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)