कोल्हापूरच्या राजेंद्रनगरमध्ये आग; पाच लाखांचे नुकसान

-तीन झोपड्या, दोन दुचाकींसह प्रापंचिक साहित्य जळून खाक
– सतेज औंधकर

कोल्हापूर – कोल्हापूरच्या राजेंद्रनगर येथील तीन झोपडपट्टींना अचानक विद्युत शॉर्ट सर्किटने आग लागून त्या आगीच्या भक्षस्थानी पडल्या. दोन दुचाकींसह प्रापंचिक साहित्य जळून सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले. पहाटे चारच्या सुमारास लागलेल्या आगीने परिसरात घबराट पसरली. भर वस्तीत लागलेल्या आगीची वर्दी मिळताच महापालिका अग्निशामक दलाच्या जवानांनी धाव घेत तीन बंबद्वारे आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

राजेंद्रनगर झोपडपट्टीच्या भरवस्तीमध्ये शंकर किसन बिरवे यांचे घर आहे. किराणा दुकान आणि दोन दुचाकी घरामध्ये होत्या. सर्वजण साखर झोपेत असताना अचानक धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाला दिसल्याने बिरवे कुटुंबीय आरडाओरड करीत जीवाच्या भीतीने बाहेर पळत आले. त्यांचा आवाज ऐकून आजूबाजूच्या झोपडपट्टीतील लोक बाहेर पळत आले.बघता…बघता बिरवे यांचे संपूर्ण घर आगीने ओढले.

आजूबाजूच्या लोकांनी घरातील पाणी मिळेल त्या भांड्याने मारून आग विझविण्याचा प्रयत्न केला; परंतु आगीची धग मोठी असल्याने पुढे जाणे धोक्याचे होते.बिरवे यांच्या घराला लागून भरत रघुनाथ सोनटक्के, रमेश अर्जुन लांबे यांची घरे आहेत. त्यांनाही आगीने ओढले. या तिन्ही घरांतील प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले. बिरवे यांच्या दोन दुचाकी आगीच्या भक्षस्थानी पडल्या. येथील नागरिकांनी तत्काळ अग्निशामक दलास वर्दी दिली. जवान दत्तात्रय जाधव, वामन चवरे, दिगंबर चव्हाण, संजय पाटील, शिवाजी नलवडे, नीलेश शिनगारे, मोहसीन पठाण, पवन कांबळे, संभाजी डफळे, आदींनी घटनास्थळी धाव घेत तीन पाण्याच्या बंबद्वारे आग विझविली.

आगीमध्ये तिन्ही कुटुंबीयांचा निवारा नाहीसा झाल्याने सैरभैर झाले आहेत. प्रापंचिक साहित्यही जळून खाक झाले. मोलमजुरी करून ते उदरनिर्वाह चालवितात. पुन्हा नव्याने झोपडपट्टीवजा घर उभा करण्याची परिस्थिती त्यांची नाही. डोळ्यासमोर घर नाहिसे झाल्याने तिन्ही कुटुंबीयांतील लोक अश्रू ढाळत आहेत. आजूबाजूच्या लोकांनी त्यांना तात्पुरता आपल्या घरी आसरा दिला आहे.
रोहन लाखे (नागरिक)

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)