भिलाई स्टील प्लांट मध्ये स्फोट 

आठ कामगार ठार ; चौदा जखमी 

भिलाई: येथील स्टील प्लांट मधील पाईपलाईनचा आज स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत तेथे काम करणारे आठ जण ठार झाले तर अन्य चौदा जण जखमी झाले आहेत. या स्टील प्लांटच्या अधिकाऱ्यांनी यात नेमके किती जण ठार झाले याची माहिती देण्यास नकार दिला. त्या सर्वांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे एवढेच त्यांनी सांगितले तथापि दुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र या दुर्घटनेत आठ जण ठार झाल्याची माहिती दिली आहे. 

-Ads-

प्लांट मधील कोळशाच्या भट्टीजवळील गॅस पाईप लाईनच्या दुरूस्तीचे काम सुरू असताना हा प्रकार घडला. हे काम सुरू होते त्यावेळी तेथे 20 जण काम करीत होते. त्याचवेळी अचानक पाईप लाईनचा स्फोट होऊन अनेक कामगार तेथेच कोसळले. यातील सर्वांना भाजल्याच्या मोठ्या जखमा झाल्या होत्या. आसपासच्या लोकांनी अनेक वाहने आणून त्या सर्वांना रूग्णालयात दाखल केले. पण उपचार सुरू असतानाच त्यातील आठ जण मरण पावले असून अन्य काहींची प्रकृती गंभीर आहे असे रूग्णालयातील सूत्रांनी सांगितले.

स्फोटानंतर प्लांटच्या काही भागाला आग लागली. त्यामुळे सर्वत्र गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकारांनंतर आसपासच्या नागरीकांनी आणि जखमींच्या नातेवाईकांनी घटनास्थळी मोठीच गर्दी केली होती. ही गर्दी आवरणे व्यवस्थापनाच्या आवाक्‍या बाहेर गेले होते म्हणून तेथे पोलिसांना पाचारण करावे लागले. आगीमुळे प्लांटच्या आतल्या भागात मोठ्या प्रमाणावर धूर घुसला. त्यामुळे काही कामगार आतच बराच काळ अडकून पडले होते. आग विझवून अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम प्राधान्याने करण्यात आले. हा स्टील प्लांट स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाच्यावतीने चालवला जातो. 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)