मतदार पत्रिकेवर मतदान केंद्राचा नकाशा
पिंपरी – मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी चौथ्या टप्प्यात म्हणजे दि. 29 एप्रिल रोजी मतदान होत आहे. मतदारांना मतदान करताना आपले मतदान केंद्र कोठे आहे याची माहिती मिळावी, यासाठी निवडणूक आयोगाने शहरी भागातात मतदान पत्रिका (व्होटर स्लिप) वर मतदान केंद्राचा नकाशा छापलेला असल्याने मतदारांना आपले मतदानकेंद्र शोधणे सुलभ होणार आहे.
निवडणूक आयोगाकडून सध्या मतदारांना मतदान पत्रिका वाटप करण्याचे काम सुरु आहे. यावेळीच्या मतदान पत्रिका मागच्या निवडणुकीच्या तुलनेत मोठ्या असून 20 बाय 13 सेंटीमीटर मतदान पत्रिकेचा आकार आहे. या स्लिपवर पुढील बाजूस मतदाराचा फोटो, नाव, मतदान केंद्राचे नाव आहे. तर स्लिपच्या मागच्या बाजूस मतदारांसाठी इंग्रजी व मराठीमधून माहिती देण्यात आली आहे.तसेच ज्या ठिकाणी मतदाराचे मतदान केंद्र आहे, त्या मतदान केंद्राचा नकाशाही देण्यात आला आहे. या नकाशामुळे मतदारांना त्यांचे मतदान केंद्र शोधणे सोपे व सुलभ होणार असल्याची माहिती नोडल अधिकारी राजेंद्र राणे यांनी सांगीतली आहे. या मतदार स्लिप वाटण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे.