अखेर उत्तरप्रदेशात सपा-बसपा आघाडी जाहीर

दोन्ही पक्ष 50-50 टक्के जागा लढवणार

कॉंग्रेस आणि अन्य मित्र पक्षांना सोडल्या चार जागा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भाजपला पराभूत करणे हा प्रमुख उद्देश

नवी दिल्ली: उत्तरप्रदेशात आत्तापर्यंत एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी या पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी करण्याची घोषणा केली आहे. या दोन्ही पक्षांनी प्रत्येकी 38-38 जागा लढवण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी कॉंग्रेसला दोन आणि अन्य मित्र पक्षांना दोन जागा सोडल्या आहेत. या आघाडीचे अन्य विरोधी पक्षांनी स्वागत केले आहे.

मायावती आणि अखिलेश यादव या नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन 38-38 जागांचा फॉर्म्युला ठरल्याचे घोषित केले. कॉंग्रेसला या आघाडीत फार स्थान देण्यात आलेले नाही त्या विषयी त्यांनी सांगितले की या राज्यात कॉंग्रेसला आघाडीत घेण्याने फार लाभ होत नाही कारण त्यांची मते आम्हाला पडत नाहीत असे त्यांनी सांगितले. अमेठी आणि रायबरेली या दोन जागा त्यांच्याकडे असतात त्या जागा आम्ही त्यांना सोडल्या आहेत असेही त्यांनी नमूद केले.

मायावती म्हणाल्या की लखनौ गेस्टहाऊस प्रकरणाची कटुता मागे टाकून आम्ही ही आघाडी केली आहे आणि आमच्यातील ही आघाडी आता बराच काळ चालेल. विधानसभेतही ही आघाडी कायम असेल असे त्यांनी स्पष्ट केले. अखिलेश यादव यांनी सांगितले की आमच्या पक्षाच्या कोणत्याही कार्यकर्त्यांनी मायावती यांचा अवमान करू नये अशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. मायावतींचा अवमान हा माझा व्यक्तीगत अवमान समजून त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे अखिलेश यांनी म्हटले आहे. या नेत्यांनी भारतीय जनता पक्षावर यावेळी जोरदार टीका केली. आमच्या आघाडीमुळे त्यांना आता झोप येणार नाही असे त्यांनी म्हटले आहे.

सुमारे 25 वर्षांच्या अवधीनंतर हे दोन्ही पक्ष राज्यात एकत्र येत आहेत. 1995 साली उत्तरप्रदेशात या दोन्ही पक्षांचे संयुक्त सरकार होते पण त्यावेळी बहुजन समाज पक्षाने या सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर समाजवादी पक्षाच्या समर्थकांनी मायावती आणि त्यांच्या आमदारांना मोठी धक्काबुक्कीही केली होती. तेव्हापासून दोन्ही पक्षांमध्ये निर्माण झालेली कटूता बरेच वर्ष कायम होती पण आता भाजपला पराभूत करण्यासाठी हे दोन्ही राजकीय पक्ष एकत्र आले आहेत.

उत्तरप्रदेशात लोकसभेच्या अलिकडेच झालेल्या तीन पोटनिवडणुकांमध्ये हे पक्ष एकत्र आले होते त्यामुळे भाजपला त्यांच्या प्रभाव क्षेत्रातही पराभव स्वीकारावा लागला होंता. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या एकत्र येण्याने भाजपला मोठे आव्हान निर्माण झाले आहे. सन 2014 च्या निवडणुकीत उत्तरप्रदेशातील 80 जागांपैकी तब्बल 73 जागा भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाने जिंकल्या आहेत. त्यामुळे इतके वर्चस्व भाजपला राखता येईल की नाही अशी शंका आता सपा-बसपा आघाडीमुळे निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)