अखेर मुहूर्त सापडला

नागरिक आजारी पडताच निघाली गळती

सातारा – सातारा-कोरेगाव मार्गावर कृष्णानगर बसस्टॉपनजीक जीवन प्राधिकरणाच्या मुख्य पाईपलाईनला गत तीन महिन्यांपासून गळती लागली होती. गळतीमुळे मोठ्या प्रमाणात पाणीही वाया जात होतच, शिवाय दूषित पाणीही पाईपलाईनद्वारे पुरविले जात होते. त्यामुळे नागरिकांकडूनही गळती काढण्यासाठी वारवार मागणी केली जात होती. मात्र, जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या जाणाऱ्या या गळती काढण्याच्या कामाला आज मुहूर्त लागला. मात्र, यासाठी नागरिकांना आजारी पडावे लागले.

कृष्णानगर बसस्टॉपनजीक तीन महिन्यांपूर्वी मुख्य पाईपलाईनला गळती लागली होती. या गळतीमुळे नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होतच होता. याशिवाय नकळत पाणीही दूषित येते होते. त्यामुळे तत्काळ ही गळती काढण्यात यावी, अशी मागणी होत होती. तसेच मोठ्या प्रमाणात गळतीमुळे पाणी वाया जात होते. मात्र, नागरिकांच्या या मागणीकडे संबंधित विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून या पाईपलाईनने पाणीपुरवठा होणाऱ्या भागातील नागरिकांना गॅस्ट्रोसदृश आजार होऊ लागले.

याची भणक संबंधित विभागाला लागताच खडबडून जाग्या झालेल्या विभागाने मंगळवारी जेसेबी तसेच कर्मचारी घेऊन गळती काढण्याच्या कामाला प्रारंभ केला. या प्रकारामुळे एक गोष्टमात्र स्पष्ट होत आहे. ती म्हणजे गळती काढायची झाल्याने नागरिकांना आजारी पडावे लागते, अशी चर्चा नागरिकांमधून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)