लग्नाच्या आमिषाने महिलेची दहा लाखांची फसवणूक
सातारा – दिव्यनगरी येथे राहणाऱ्या महिलेस लग्नाचे आमिष दाखवून लाखो रुपयांना लुबाडणाऱ्या मुंबईच्या भामट्याला सातारा तालुका पोलिसांनी मंगळवारी अखेर जेरबंद केले. विनय राजेश लोहिरे असे संबंधित भामट्याचे नाव असून पोलिसांनी कौशल्यपूर्वक तपास करत त्याला मुलुंड येथून ताब्यात घेतले.
लोहिरे याच्यावर 24 मे 2019 रोजी नऊ लाख 95 हजाराच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. गुन्हेगार अत्यंत चलाख व त्याच्याविषयीची माहिती अत्यंत त्रोटक असल्याने केवळ तपासाच्या दृष्टीने सातारा तालुका पोलिसांचे पथक पुणे व मुंबई येथे त्याचा शोध घेत होते. आरोपी मुंबईत उच्चभ्रू वस्तीत रहात असल्याने कोणालाही संशयसुध्दा येत नव्हता. मात्र उपविभागीय अधिकारी समीर शेख व तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आप्पासाहेब मांजरे यांनी या प्रकरणाचा पिच्छा पुरवला.
उपनिरीक्षक नारायण गीते यांनी चिवट तपास केला. लोहिरे याच्या मोबाईल कॉलवरून त्याचे मुलुंड लोकेशनसमोर आल्यानंतर पोलिसांनी रात्री दहाच्या दरम्यान घरातूनच त्याची गठडी वळली. लोहिरे हा सराईत गुन्हेगार असून आळंदी व हडपसर येथे त्याच्या विरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. समोरच्याला वेगवेगळ्या थापा देऊन लाखो रुपये उकळायचे आणि मौजमस्ती करायची अशी लोहिरे याची गुन्ह्याची पध्दत होती. त्याला मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्याला 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.