फिनआयक्‍यू एटीटी आशियाई मानांकन महिला टेनिस स्पर्धा आजपासून

पुणे – पुण्यातील मेट्रोसिटी स्पोर्टस क्‍लब या टेनिस कोर्टवर येत्या 28 एप्रिल ते 5 मे या कालावधीत पहिलीवहिली 3000डॉलर पारितोषिक रकमेची फिनआयक्‍यू एटीटी आशियाई मानांकन महिला टेनिस स्पर्धा रंगणार असून यामध्ये भारताच्या साई संहिता चमर्थी आणि मिहिका यादव या डब्लूटीए मानांकित खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.

स्पर्धेला फिनआयक्‍यू यांनी प्रायोजित केले असून नवनाथ शेटे स्पोर्टस अकादमी यांच्या तर्फे एमएसएलटीए यांच्या सहकार्याने आशियाई टेनिस संघटना व अखिल भारतीय टेनिस संघटना आणि पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिसस संघटना यांच्या मान्यतेखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रोफेशनल टूर स्पर्धांविषयी अनिश्‍चितता निर्माण झाल्यामुळे या विभागातील टेनिस पटूंचे हित ध्यानात घेऊन आशियाई टेनिस संघटनेने आयोजित केलेल्या महिला आशियाई टेनिस टूर स्पर्धा मालिकेतील हि पहिलीच स्पर्धा ठरणार आहे.

या पद्धतीने देण्यात येणाऱ्या वाईल्ड कार्ड प्रवेशांना 2020 मध्ये सुरुवात होणार असून यंदाच्या वर्षाअखेरच्या मानांकन यादतीतील अव्वल 10 खेळाडूंना ही संधी मिळणार आहे.त्यामध्येही आशिया खंडात 2020 मध्ये होणाऱ्या एटीपी चॅलेंजर स्पर्धांमध्ये 10 पुरुष मानांकित खेळाडूंना हा मान मिळणार असून महिला गटातील 25000डॉलर किंवा त्यावरील दर्जाच्या आयटीएफ स्पर्धांमध्ये 10 अव्वल महिला खेळाडूंना वाईल्डची संधी मिळणार असल्याचे स्पर्धा संचालक नवनाथ शेटे यांनी सांगितले.

स्पर्धेतील विजेत्या महिला खेळाडूला एटीपी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये 50,75 व 100 गुणांची कमाई करता येणार आहे. तसेच या गुणांचे रुपन्तर एआयटीए गुणांमध्ये थेट करता येणार आहे. मुख्य ड्रॉमध्ये 24 थेट प्रवेशिका, 4 वाईल्ड कार्ड प्रवेशिका आणि पात्रता फेरीतून 4 स्पर्धकांचा समावेश असणार आहे.

स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला 31हजार रुपये व करंडक, तर उपविजेत्या खेळाडूला 20हजार रुपये व करंडक देण्यात येणार आहे. याशिवाय उपांत्य फेरीतील खेळाडूला 12हजार रुपये, उपांत्यपूर्व फेरीतील खेळाडूंना 8500रुपये, पहिल्या फेरीतील खेळाडूंना 5000रुपये आणि मुख्य ड्रॉमध्ये प्रवेश करणाऱ्या खेळाडूला 3500 रुपये देण्यात येणार आहे. स्पर्धेच्या पात्रता फेरीचे सामने रविवार व सोमवार या दिवशी होणार आहे.

स्पर्धेतील मानांकित खेळाडूंची यादी खालीलप्रमाणे:

1.साई संहिता चमर्थी, 2. मिहिका यादव, 3. भुवना कलवा, 4.निधी चिलूमुला, 5. काव्या सव्हानी, 6 प्रेरणा विचारे, 7. श्रीवल्ली रश्‍मीका भामिदिप्ती, 8. रिया उबवेजा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)