फिल्मी स्टाईलने पाठलाग, आरोपीला अटक

अल्पवयीन मुलांचाही लूट करण्यात सहभाग ः दोन अद्याप फरार

पिंपरी – आरोपी घरी येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस त्याच्या घराजवळ सापळा रचतात. मात्र पोलीस आपल्या आसपास असल्याची कुणकुण लागताच आरोपी वडिलांची दुचाकी घेऊन पळ काढतो आणि सुरू होतो पाठलागचा थरार. एकदम फिल्मी स्टाईलने पाठलाग करत पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले.

गुन्हे शाखा युनिट एक व दिघी पोलीस पथकाने ही कारवाई करत जबरी चोरीतील आरोपीला पकडले आहे. या आरोपीने आपल्या तीन साथीदारांसह 17 एप्रिल रोजी दिवसा ढवळ्या एका खासगी कंपनीचे डेली कलेक्‍शन करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार करत लुटले होते. दिपक नवनाथ बन (वय-19 रा. भोसरी) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 17 एप्रिल रोजी झालेल्या लूट प्रकरणी शंभुलिंग चंद्रकांत कलशेट्टी (वय-29 रा. कासारवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. दिवसा ढवळ्या कोयत्याने वार करुन 88 हजार 500 रुपये जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना घडल्यामुळे दिघी पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट आरोपींच्या शोधात होते. पोलिसांनी या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी त्यांच्या साथीदारांच्या मदतीने ही चोरी केल्याचे सांगितले. त्या मुलांनी दिलेल्या माहितीच्या आधारे तपास करीत असताना यातील आरोपी बन हा भोसरी येथे त्याच्या घरी येणार असल्याची खबर पथकातील महेंद्र तातळे व सचिन उगले यांना मिळाली.

पोलिसांनी सापळा रचला मात्र पोलिसांची कुणकुण लागल्याने बन याने वडिलांची दुचाकी घेऊन आळंदीच्या दिशेने पळ काढला. यावेळी पोलिसांनी पाठलाग करत त्याला आळंदी येथून अटक केले. पोलिसांनी आरोपीकडून चोरीतील 49 हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. मात्र या गुन्ह्यातील आरोपीचा साथीदार तुषार चव्हाण व आणखी एक साथीदार हे अद्यापही फरार आहेत. त्यांचा शोध पोलीस घेत असून पुढील तपासासाठी बन याला दिघी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)