उत्कंठावर्धक “अंधाधून’ 

दिग्दर्शक श्रीराम राघवन यांनी “एक हसीना थी’, “जॉनी गद्दार’, “बदलापूर’ या चित्रपटातून आपली स्वतंत्र शैली निर्माण केली आहे. तर अभिनेता आयुषमान खुराणा आपल्या भूमिकांची निवड फार काळजीपूर्वक करत प्रेक्षकांना काहीतरी वेगळे देण्याचा प्रयत्न करत असतो, यामुळे या दोघांच्या “अंधाधून’ विषयी सर्वांच्याच मनात उत्कंठा निर्माण झाली होती. हा चित्रपट फ्रेंच शॉर्ट फिल्म ‘द पियानो ट्यूनर’वर आधारीत आहे.
“अंधाधून’ ही पुण्यातील प्रभात रोडवर राहणारा अंध पियानो वादक आकाश ( आयुषमान खुराणा) भोवती गुंफण्यात आलेली कथा आहे. पियानोची प्रचंड आवड असलेल्या आकाशचं लंडनला जाऊन पियानो शिकण्याचं स्वप्न आहे. त्याच्या आयुष्यात एका मुलीची एन्ट्री होते, ती आपल्या वडिलांच्या हॉटेलमध्ये काम मिळवून देते, इथेच त्याची ओळख जुन्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्याशी होते, ते त्याला लग्नाच्या वाढदिवशी आपल्या घरी मैफल करायला येण्याचे निमंत्रण देतात. हा घरी गेल्यावर तिथे अचानक एक घटना घडते आणि आकाश एका प्रकरणात अडकतो… आणि सरळ सुरू असणाऱ्या कथेला तिथूनच एक वेगळी कलाटणी मिळते. ती कलाटणी नेमकी काय आहे? त्या ठिकाणी नक्की काय घडतं आणि त्यातनं पुढे घडत जाणारा गुंता कसा सुटतो? या प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्यासाठी “अंधाधून’ हा चित्रपट बघायला हवा.
श्रीराम राघवन दिग्दर्शित “अंधाधून’ ची कथा अर्जित विश्‍वास, पूजा लोथा श्रुती, आणि योगेश चांदेकर यांनी लिहिली आहे. शॉर्टफिल्मवर आधारीत कथानक असले तरी त्याचा प्रभाव यावर जाणवत नाही. चित्रपट पहिल्या दहा पंधरा मिनिटांत वेग घेतो आणि प्रेक्षक खुर्चीला खिळून बसतात, मध्यंतरानंतर कथानकात काही वळण येतात आणि चित्रपट दिग्दर्शकाच्या हातून निसटतो आहे वाटते मात्र दिग्दर्शकाची पकड अधिक घट्ट होत जाते. चित्रपटात अनपेक्षित आणि रंजक असे टर्न आणि ट्‌विस्ट बघायला मिळतात. चित्रपटाचा क्‍लायमॅक्‍स अतिशय रंजक आहे. चित्रपटाची पटकथा, संवाद, दिग्दर्शन, संगीत, छायांकन, संकलन या सर्व तांत्रिक बाबी उत्तम झाल्या आहेत.
कलाकारांच्या अभिनय बद्दल सांगायचे तर आयुषमान खुराणाने चित्रपटात अतिशय उत्तम अभिनय केला आहे. त्याच्या करिअरमधील आजवरचा बेस्ट परफॉर्मन्स म्हटला, तर वावगे ठरु नये. नेटफ्लीक्‍स वरील वेबसिरीज मुळे चर्चेत असलेली राधिका आपटे इथे नव्याने समोर येते आणि तिचा वावर सुखवणाराच आहे. तब्बूसाठी केवळ लाजवाब एवढा एकच शब्द बस आहे. चित्रपटात अनिल धवन, अश्विनी काळसेकर, मानव वीज, झाकीर हुसैन, छाया कदम यांची कामे उत्तम झाली आहेत.
“अंधाधून’ मध्ये संगीतकार अमित त्रिवेदींने अफलातून जादू केली आहे. पार्श्वसंगीत, प्रसंग जसे घडत जातात तसं बदलणारे पियानोचे स्वर असो वा सत्तरच्या दशकाची आठवण देणारी गाणी, या संगीतामुळे चित्रपट सुंदर झाला आहे.
चित्रपटाबद्दल एकंदरीत सांगायचे तर उत्तम कथा, त्याला पटकथा आणि संवादांची जोड यामुळे प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात दिग्दर्शक श्रीराम राघवन यशस्वी झाले आहेत. तुम्हाला सस्पेंस थ्रिलर चित्रपट आवडत असतील हा आयुषमान राधिका आपटेचा “अंधाधून’ आवर्जून बघा.
चित्रपट – अंधाधून 
निर्मिती – वायकॉम 18 मोशन पिक्‍चर्स, मॅचबॉक्‍स पिक्‍चर्स 
दिग्दर्शक – श्रीराम राघवन 
संगीत – अमित त्रिवेदी, रफ्तार, गिरीश नाकोड 
कलाकार – आयुषमान खुराना, राधिका आपटे, तब्बू, अनिल धवन, झाकीर हुसेन, अश्विनी काळसेकर, मानव वीज, छाया कदम 
रेटींग – **** 
-भूपाल पंडित 

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
8 :thumbsup:
4 :heart:
1 :joy:
2 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)