सरपंचांनी एकत्र येऊन पाण्यासाठी लढा उभारा

शिवबा संघटना ः शेतकरी त्रस्त, राजकारणी निवडणुकीत मस्त

सुपा  – जनावरांचा चारा जळून खाक झालाच आहे. पिण्याचा प्रश्‍न आहेच, फळबागाही संपुष्टात येत आहेत, मात्र अजूनही कालव्याचे पाणी येणार कधी हे सांगता येत नाही. शिवबा संघटनेच्यावतीने आवाहन करण्यात येत आहे की, लाभधारक भागातील सर्व सरपंचांनी एकत्र येऊन पाण्यासाठी तीव्र लढा उभारणे गरजेचे आहे. असे शिवबा संघटनेने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

पारनेर तालुक्‍यात कुकडी डावा कालव्याचे पाणी वेळेत येत नसल्याने पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्‍न परिसरात निर्माण झाला आहे. पुणे जिल्ह्यात तर नेते व शेतकरी तीव्र आंदोलन करत आहेत. सध्याही जुन्नर परिसरात पाण्यासाठी आंदोलन सुरू आहेत. याउलट परिस्थिती पारनेरसह लाभधारक परिसरात आहे. सध्या लोकसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असल्याने, नेतेमंडळी प्रचारात असून, शेतकरी मात्र पाण्यासाठी त्रासल्याचे चित्र तालुक्‍यात पहावयास मिळत आहे.

याभागातील नेतेमंडळी त्याचप्रमाणे सर्व गावचे सरपंच यांनी एकत्र येऊन नियोजन करणे गरजेचे असल्याचे शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे यांनी सांगितले. तालुक्‍यात भीषण परिस्थिती निर्माण झाली असताना, अशावेळी लोकांसाठी काहितरी करण्याची वेळ आहे, असे समजून दबावतंत्र तयार करून, तत्काळ पाणी कसे मिळेल? यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे. मात्र कोणाचेही याकडे लक्ष नसल्याचे दिसून येते. सर्व भागातील शेतकरी बांधवांनी आपल्या सरपंचांना जाब विचारला पाहिजे की, पुणे जिल्ह्यात पाणी येते अन्‌ नगर जिल्ह्यात का नाही? असा प्रश्‍न उपस्थित करावा. असेही पत्रकात म्हटले आहे. प्रसिद्धीपत्रकावर शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे, शंकर वरखडे, अंकुश वरखडे, नौशाद पठाण, शांताराम पाडळे, जयराम सरडे, सुरज शिरसाठ, विश्‍वास शेटे, राहुल शेटे, खंडू लामखडे, नीलेश लामखडे, नीलेश वरखडे, सचिन कोतकर, नवनाथ बरशिले, दत्ता टोणगे, गणेश लंके, स्वप्नील लामखडे, पोपट वरखडे, नवनाथ लामखडे, गणेश चौधरी, अभय शेटे, प्रितेश पानमंद आदिंच्या सह्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)