पुण्यातही “फिफ्टी-फिफ्टी’ फॉर्म्युला?

पुण्यातील विधानसभेच्या 8 जागांसाठी भाजपला 5 तर, शिवसेनेला 3 जागा वाटपाची शक्‍यता

पुणे – आगामी लोकसभा आणि विधानसभांसाठी भाजप-शिवसेना युतीवर शिक्‍कामोर्तब झाला आहे. त्यामध्ये विधानसभेसाठी प्रत्येकी 50 टक्‍के जागांचे वाटप निश्‍चित करूनच युतीचे “रणशिंग’ फुंकले आहे. परंतु, पुणे विधानसभेसाठी शिवसेनेला किती आणि कोणत्या जागा मिळणार, कोणत्या विद्यमानांना घरी बसावे लागणार याबाबत मोठी उत्सुकता लागून राहिली आहे. दरम्यान, पुण्यातही “फिफ्टी-फिफ्टी’ जागा वाटपाचा फॉर्म्युला ठेवण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे हा फॉर्म्युला विद्यमानांना मान्य होणार का? युतीची “घडी’ कितपत टिकणार…की पुन्हा…?

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आगामी लोकसभेसाठी भाजप 25 तर, शिवसेना 23 असा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला. परंतु, शिवसेनेसाठी विधानसभेच्या जागा वाटपाचा महत्त्वाचा मुद्दा असून, विधानसभेत दोघांनाही “फिफ्टी-फिफ्टी’ जागा असतील, या निर्णयावर युती झाली आहे. यावेळी काही प्रमुख जागांवरून प्राथमिक चर्चाही झाली असून, पुण्यातील विधानसभेच्या 8 जागांसाठी भाजपला 5 आणि शिवसेनेला 3 अशा प्रकारे जागा वाटपाचा फॉर्म्युला असेल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

सद्यःस्थितीत पुण्यात सर्वच्या सर्व 8 जागांवर भाजपचे आमदार निवडून आले आहे. त्यामुळे या आठपैकी कोणत्या जागा सेनेला द्यायच्या यावर ठोस निर्णय अद्याप झालेला नाही. त्यातूनही कोथरूडच्या जागेवरून दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असून, ही जागा कोणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. एवढेच नव्हे तर या जागा वाटपातून मागच्यावेळीप्रमाणे विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना मित्रपक्ष “युतीचा हात सोडणार’ नाही ना… अशी शंका निर्माण झाली आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे विधानसभेत शिवसेनेकडून भाजपकडे 4 जागांची मागणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये कोथरूड, हडपसर, खडकवासला आणि शिवाजीनगर या जागांची मागणी करण्यात आली आहे. तसेच वडगाव शेरीमध्येही मागच्या विधानसभेला शिवसेनेचा उमेदवार थोड्याच मतांनी दुसऱ्या स्थानी राहिला. त्यामुळे या जागेवरही शिवसेनेने दावा केला आहे. परंतु, भाजपकडून केवळ तीनच जागा सेनेला देण्याची तयारी दर्शविली असून, त्यामध्ये कोथरूड आणि खडकवासला सोडून हडपसर, वडगाव शेरी, शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट यामधील कोणत्याही 3 जागा सेनेला देण्याची तयारी आहे. मात्र, कोथरूडची पूर्वीची जागा सेनेला मिळाली पाहिजे, तसेच खडकवासला, हडपसर आणि शिवाजीनगर याठिकाणीही सेनेला जागा मिळावी असा आग्रह धरण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात “फिफ्टी-फिफ्टी’ तसेच पुण्यातही “फिफ्टी-फिफ्टी’चा फॉर्म्युला ठेवणार असून, त्यावर काय निर्णय होतो, याचे चित्र लोकसभेच्या निवडणुकीनंतर स्पष्ट होईल.

कोथरूडच्या जागेसाठी रस्सीखेच
युतीमध्ये हडपसर आणि वडगाव शेरीमध्ये जागा वाटप करताना दोन्ही पक्षांना फारशी कसरत करावी लागणार नाही. परंतु, शिवाजीनगर आणि खडकवासला विधानसभेत शिवसेनेकडे सक्षम उमेदवार असल्यामुळे त्या जागांवर सेनेकडून दावा केला जाण्याची शक्‍यता आहे. तसेच मागच्यावेळी युती फिसकटल्यामुळे कोथरूड विधानसभा हातातून गेली. मात्र, युतीमुळे दोन्ही पक्षांकडून कोथरूडच्या जागेसाठी रस्सीखेच सुरू आहे. सध्यातरी शिवसेनेकडून 3 आणि भाजपकडून 2 उमेदवार निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे 5 उमेदवारांमधून एकाची निवड करताना दोन्ही पक्षाला तारेवरची कसरत करावी लागणार हे नक्‍की. यात बाजी कोण मारणार? याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)