सेंट पीटर्सबर्ग: इंग्लंडचा संघ फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत पराभूत झाला असला, तरी या संघाचा कर्णधार हॅरी केनचा “गोल्डन बूट’ पुरस्कार जवळपास निश्चित मानला जात आहे. विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूस हा पुरस्कार दिला जातो. हॅरी केनने या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत सर्वाधिक 6 गोल केले आहेत. मात्र, याचा निर्णय 15 जुलैला होणाऱ्या अंतिम लढतीनंतरच होईल.
“गोल्डन बूट’ पुरस्काराच्या शर्यतीत फ्रान्सचे अँटोइन ग्रिझमन आणि एम्बापेदेखील आहेत. पण, त्यासाठी या दोघांपैकी एकाला अंतिम लढतीत किमान 4 गोल नोंदवावे लागणार आहेत. सध्या दोघांच्या खात्यात प्रत्येकी 3 गोल आहेत. क्रोएशियाचा या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील खेळ पाहता आणि फ्रान्सचा उपान्त्य फेरीतील खेळ बघता अंतिम लढतीत गोलचा पाऊस पडण्याची शक्यता कमीच असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे हॅरी केनला आतापासूनच ‘गोल्डन बूट’चा मानकरी निश्चित मानले जात आहे.
फ्रान्स व क्रोएशियामधील अंतिम लढत 15 जुलैला होणार आहे. पराभवानंतर हॅरी केन म्हणाला की, आम्ही प्रचंड तणावाखाली आणि निराश आहोत. काही काळ तरी या पराभवाच्या वेदना कायम राहतील. पहिला गोल केल्यानंतर आम्ही विजयासाठी पुरेशी कामगिरी केली असल्याचे आम्हाला वाटत होते. मात्र, आम्ही विजयापासून वंचित राहिलो. त्यामुळे पराभवाचे दु:ख होणे स्वाभाविक आहे. यापेक्षा जास्त मी काही बोलू शकणार नाही.
सर्वाधिक गोल करणारे खेळाडू
हॅरी केन (इंग्लंड) – 6 गोल, रोमेलू लुकाकू (बेल्जियम), ख्रिस्टियानो रोनाल्डो (पोर्तुगाल), देनिस चेरिशेव (रशिया) – 4 गोल
येरी मिना (कोलंबिया), एम्बापे (फ्रान्स), दिएगो कोस्टा (स्पेन), अन्टोनी ग्रिझमन (फ्रान्स), झ्युबा (रशिया), कॅव्हानी (उरुग्वे) – 3 गोल.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा