सेंट पीटर्सबर्ग: फ्रान्सच्या सध्याच्या संघात एकाहून एक सरस दर्जाचे खेळाडू आहेत. बाजारपेठेतील त्यांचे एकत्रित मूल्य एक अब्ज डॉलर्सपेक्षा अदिख आहे. त्यांच्या कर्तृत्वाबद्दल कोणालाच शंका नाही. त्यांच्यात एकच उणीव आहे, ती म्हणजे विश्वचषक विजेतेपदाची. परंतु पॉल पोग्बा, कायलियन एमबापे आणि सहकाऱ्यांना ही उणीव भरून काढण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे.
बेल्जियमचे आव्हान 1-0 असे मोडून काढताना फ्रान्सने फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. येत्या रविवारी होणाऱ्या अंतिम लढतीत त्यांच्यासमोर इंग्लंड आणि क्रोएशिया यांच्यातील विजयी संघाचे आव्हान असेल. काल रात्री झालेल्या उपान्त्य लढतीत सॅम्युएल उमटिटीने 51व्या मिनिटाला केलेल्या गोलमुले फ्रान्सला ही संधी मिळाली आहे. परंतु हा गोल मी केला असला, तरी हा विजय मात्र फ्रान्सच्या संपूर्णंसघाचा आहे, आमच्या सांघिक कामगिरीचा आहे, असे सांगणाऱ्या उमटिटीने त्यांच्या यशाचे गुपितच उघड केले आहे.
सरासरी वय केवळ 26 वर्षे असलेल्या फ्रान्सच्या युवा संघाला येत्या रविवारी मॉस्कोतील लुझनिकी स्टेडियमवर विश्वचषक उंचावण्याची निश्चितच संधी आहे. अंतिम सामन्यात विजय मिळवून गेल्या 12 वर्षांत गमावलेल्या दोन अंतिम लढतींची भरपाई करण्याची ही संधी फ्रान्सचे खेळाडू कशी साधतात याची उत्सुकता त्यांच्या पाठीराख्यांबरोबरच जगभरातील फुटबॉलशौकिनांनाही आहे. याआधी 2006 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत, तसेच 2016 युरो चषक अंतिम लढतीत पराभव पत्करल्यामुळे फ्रान्सला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
बेल्जियमवरील विजयात फ्रान्सचा गोलरक्षक ह्यूगो लोरिसचा मोलाचा वाटा होता. पूर्वार्धात टोबी आल्डेरविरेल्डचा फटका उजवीकडे सूर मारून रोखणाऱ्या लोरिसने उत्तरार्धात लुकाकूसमोर झेप घेत अप्रतिम सेव्ह केला. कॉर्नर आणि पेनल्टी यामुळेच बहुतांश गोल होत असताना फ्रान्सचा विजयी गोल मात्र मैदानी होता. ग्रिझमनने उजव्या बगलेवरून उंचावरून दिलेल्या पासवर उमटिटीने अफलातून हेडर लगावीत चेंडू उजव्या गोलपोस्टनजीक जाळ्यात मारला.
या वेळी व्हीआयपी कक्षात बसलेले फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी बेल्जियमच्या किंग फिलिप यांच्याशी हस्तांदोलन करून हा गोल साजरा केला. दोघांच्या मध्यभागी असलेले फिफाचे अध्यक्ष गियीान इन्फन्टिनो पाहातच राहिले. परंतु दोन्ही राष्ट्रप्रमुखांच्या चेहऱ्यावरील भाव वर्णन करण्यापलीकडचे होते. समालोचकांनाही या क्षणाचे वर्णन करण्यासाठी योग्य शब्द सापडले नाहीत.
देसचॅम्प्स यांना विश्वविक्रमाची संधी
फ्रान्सचे प्रशिक्षक दिदियर देसचॅम्प्स यांना आगळ्यावेगळ्या विश्वविक्रमाची संधी आहे. फ्रान्सने येत्या रविवारी विश्वचषक उंचावल्यास खेळाडू म्हणून आणि प्रशिक्षक म्हणूनही विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम करणारे देसचॅम्प्स ही जगातील केवळ तिसरी व्यक्ती ठरतील. याआधी जर्मनीचा महान खेळाडू फ्रॅन्झ बेकनबावर आणि ब्राझिलचे मारिओ झागालो यांनी हा मान मिळविला आहे. देसचॅम्प्स यांनी फ्रान्सचा कर्णधार म्हणून 1998 मध्ये विश्वचषक उंचावला होता.
फ्रान्सने विश्वचषक जिंकल्याचा तो एकमेव प्रसंग आहे. त्यानंतर प्रशिक्षक म्हणून फ्रान्सला दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकून देऊन इतिहास घडविण्याची त्यांना संधी आहे. वास्तविक सुपरस्टार खेळाडूंचा संघात समावेश असूनही विनाकारण अनेक प्रयोग केल्याबद्दल देसचॅम्प्स यांना टीकेला सामोरे जावे लागले आहे. परंतु त्यांच्याच निर्णयांमुळे फ्रान्स संघ अंतिम फेरीत पोहोचल्याचे टीकाकारांनाही मान्य करावे लागले आहे. 2006 विश्वचषक स्पर्धा आणि 2016 युरो चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीतील पराभवांची खऱ्या अर्थाने भरपाई करायची असेल, तर रविवारी आम्हाला अंतिम लढत जिंकलीच पाहिजे, असे सांगताना देसचॅम्प्स यांनी आपल्या शिष्यांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा