फिफा विश्वचषक : पनामावरील विजयामुळे ट्युनिशिया तिसऱ्या स्थानावर 

मोर्डोव्हिया अरेना: अत्यंत रंगतदार लढतीत पनामाचा प्रतिकार 2-1 असा मोडून काढताना ट्युनिशियाने फिफा विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धेच्या जी गटातील गटसाखळी फेरीचा विजयाने शेवट केला. या विजयामुळे ट्युनिशियाने विश्‍वचषक स्पर्धेतील पहिल्यावहिल्या विजयाची नोंद केली. तर पनामाने सलग तिसरी लढत गमावली.
वास्तविक पाहता बेल्जियम आणि इंग्लंड यांनी जी गटातून याआधीच बाद फेरी गाठली आहे. तसेच पनामा आणि ट्युनिशिया या दोन संघांचे आव्हान अखेरच्या गटसाखळी लढतीपूर्वीच संपुष्टात आले असल्याने तिसरे व चौथे स्थान निश्‍चित होण्यापलीकडे या सामन्यातून फारसे काही निष्पन्न होणार नव्हते. परंतु त्यामुळे या लढतीच्या दर्जात कोणतीही कमतरता राहिली नव्हती. दोन्ही संघांनी जणू काही या लढतीवर आपले भवितव्य अवलंबून असल्यासारखा खेळ केला.
 तरीही या सामन्यातील पहिला गोल “सेल्फ गोल’ ठरावा, हा आगळा योगायोग होता. पूर्वार्धात दोन्ही संघ एकमेकांच्या गोलक्षेत्रावर आक्रमणे करीत असताना पनामाची अशीच एक चढाई रोखण्याच्या प्रयत्नांत ट्युनिशियाच्या यासिन मेरियाहने स्वयंगोल करीत पनामाला 1-0 अशी आघाडी घेण्याची संधी दिली. त्यानंतर अनेकदा प्रयत्न करूनही ट्युनिशियाला मध्यंतरापर्यंत बरोबरी साधता आली नाही.
अर्थात ट्युनिशियाने उत्तरार्धात या अपयशाची पुरेपूर भरपाई केली.
51व्या मिनिटाला वाहबी खाझरीच्या पासवर फखरेद्दिन बेन युसूफने ट्युनिशियाला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. मात्र त्यामुळे पनामाच्या झुंजार खेळावर कोणताही परिणाम झाला नव्हता. त्यांनी ट्युनिशियाला कडवी झुंज देण्याचा आपला प्रयत्न कायम राखला आणि सामन्यातील रंगतही त्यामुळे कमी झाली नाही.
ट्युनिशियानेही चढायांचा वेग वाढवीत पनामावरील दडपण वाढविले. परिणामी 66व्या मिनिटाला ट्युनिशियाने दुसरा गोल करीत 2-1 अशी आघाडी घेतली. या वेळी ओसामा हदादीच्या पासवर वाहबी खाझरीने अचूक लक्ष्यवेध केला. त्यानंतर दोन्ही संघांनी गोल करण्याच्या प्रयत्नांत धसमुसळा खेळ केला. त्यामुळे उरलेल्या केवळ 24 मिनिटांच्या खेळात ट्युनिशियाच्या अनिस बद्री व घैलेन चालाली यांना, तसेच पनामाच्या रिकार्डो ऍव्हिला, गॅब्रिएल गोमेझ आणि लुईस तेजदा यांना “यलो कार्ड’द्वारे ताकीद मिळाली.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)