फिफा विश्वचषक : पोर्तुगाल-उरुग्वे कडव्या झुंजीची अपेक्षा 

सोची: विश्‍वचषक स्पर्धेतील उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांचे चित्र स्पष्ट झाले असून अनेक धक्‍कादायक निकालांनंतर आता बाद फेरीची सुरुवात होत आहे. त्यात पोर्तुगालचा मुकाबला उद्या (शनिवार) होणाऱ्या लढतीत अपराजित राहिलेल्या उरुग्वेविरुद्ध रंगणार आहे. या सामन्यात दोन्ही संघ तुल्यबळ असून फुटबॉलशौकिनांना कडव्या झुंजीचीच अपेक्षा आहे.
स्पर्धेच्या सुरुवातीला दुबळे म्हणून ज्यांची गणना केली गेली, ते क्रोएशिया, स्वीडन, मेक्‍सिको, उरुग्वे, डेन्मार्क, रशिया संघ बलाढय म्हणून समोर आले. पहिल्या फेरीत केलेल्या खराब कामगिरीमुळे फुटबॉल जगताच्या टीकेस कारणीभूत ठरलेल्या स्पेन, पोर्तुगाल, ब्राझिल, अर्जेटिना या संघांनी अडखळत का असेना पण बाद फेरी अखेर गाठलीच.
युरो चषक स्पर्धेतील यशानंतर पोर्तुगाल संघाला वेध लागलेत ते विश्‍वचषक विजयाचे. चार वर्षांपूर्वी ब्राझिलमध्ये त्यांना साखळी फेरीचा अडथळा पार करता आला नव्हता. मात्र चार वर्षांनंतरचा पोर्तुगाल संघ अधिक प्रगल्भ झाला आहे आणि मोठया स्पर्धामध्ये आपली छाप पाडण्यासाठी उत्सुक आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डोची ही अखेरची विश्‍वचषक स्पर्धा असल्याने तोही जेतेपदासह शेवट करण्यासाठी आसुसलेला आहे. मात्र रोनाल्डो वगळता इतर खेळाडू संघासाठी आवश्‍यक कामगिरी करण्यास अपयशी ठरत आहेत आणि हाच पोर्तुगाल संघासमोरील सर्वात मोठा अडथळा आहे. त्यांच्या कडील कोन्सॅलो ग्युडेस वगळता इतर खेळाडूंकडून रोनाल्डोला म्हणावी तशी साथ मिळत नसल्याने संघ अडखळत अडखळत बाद फेरीत पोहोचला आहे.
दुसरीकडे आपल्या गटात अव्वल राहिलेल्या उरुग्वेच्या संघाने आतापर्यंत उत्तम खेळाचे प्रदर्शन केले आहे. ब्राझिल आणि अर्जेटिना या बलाढय संघांचा समावेश असूनही उरुग्वेने दक्षिण अमेरिका गटातून विश्‍वचषक स्पर्धेची पात्रता फेरी यशस्वी पार करून विश्‍वचषकाच्या गटसाखळीत अव्वल कामगिरी करत पहिल्या स्थानासह बाद फेरी गाठली. उरुग्वेकडे एडिसन कॅव्हानी आणि लुईस सुआरेझ ही आक्रमणाची तोफजोडी आहे आणि त्यांच्यासोबतीला रॉड्रिगो बेटांकर हा उदयोन्मुख खेळाडू आहे.
त्यांच्या बचावफळीत जोस गिमेनेझ आणि डिएगो गॉडिन हेही आहेत. त्यामुळे एक कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून उरुग्वेकडे पाहिले जात आहे. त्यातच डिएगो गॉडिन आणि रोनाल्डो यांच्यातील वैर सर्वांनाच ठाऊक आहे त्यामुळे आजच्या सामन्यातील तो एक औत्सुक्‍याचा विषय ठरणार आहे. त्यातच स्पर्धेत आतापर्यंत उत्कृष्ट सांघिक कामगिरी करणाऱ्या उरुग्वेसमोर पोर्तुगालच्या रोनाल्डोला रोखण्याचे प्रमुख आव्हान असणार आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)