फिफा विश्वचषक : अर्जेंटिनासमोर आज फ्रान्सचे तगडे आव्हान ; मेस्सीच्या खेळावरच संघाची मदार 

कझान: भल्याभल्यांचे अंदाज चुकवीत पार पडलेल्या साखळी फेरीनंतर फिफा विश्‍वचषक स्पर्धेच्या बाद फेरीला उद्या (शनिवार) प्रारंभ होत आहे. यातील पहिल्या लढतीत पाचव्या स्थानावरील अर्जेंटिनासमोर सातव्या क्रमांकावरील फ्रान्सचे तगडे आव्हान आहे.
अर्जेटिनाचा साखळी फेरीतील आलेख पाहिल्यास बाद फेरीत त्यांच्या कामगिरीचा अंदाज बांधणे अवघड आहे. पात्रता फेरीत त्यांनी उरुग्वे आणि ब्राझिल पाठोपाठ कसेबसे तिसरे स्थान प्राप्त केले होते. मात्र पात्रता फेरीत त्यांना चार पराभवही पत्करावे लागले होते. आणि गट साखळी फेरीत तर अखेरच्या क्षणी मिळवलेल्या विजयाच्या जोरावर अर्जेंटिना बाद फेरीत दाखल झाला आहे.
त्यातच अर्जेंटिना संघातील स्टार खेळाडू मेस्सी आणि फुटबॉलच्या मैदानात असणाऱ्या त्याच्या वर्चस्वाविषयी काही वेगळे सांगण्याची गरज नाही. पण, यंदाच्या फिफा विश्वचषक स्पर्धेत सुरुवातीपासूनच मेस्सीच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरलेल्या अर्जेंटिना संघाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मेस्सीकडून क्रीडारसिकांच्या अपेक्षाही पूर्ण झाल्या नाहीत. या साऱ्यांमध्ये मेस्सीला अनेक बाजूंनी टीकेला सामोरे जावे लागले. अगदी आता त्याने निवृत्तीचा विचार करावा अशा प्रतिक्रियाही अनेकांनी दिल्या.
परंतु अर्जेंटिना संघाचे स्पर्धेतील अस्तित्व धोक्‍यात असतानात या संघाने नायजेरियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या अखेरच्या गटसाखळी सामन्यात असा खेळ केला की अनेकांनी पुन्हा एकदा “मेस्सी इज बॅक’ असं म्हणत या स्टार खेळाडूची पाठ थोपटली. त्यामुळे फ्रान्सविरुद्धच्या सामन्यात मेस्सीला मोलाची भूमिका बजावावी लागणार आहे. किंबहुना त्याच्या कामगिरीवरच अर्जेंटिनाचे भवितव्य अवलंबून आहे. प्रशिक्षक जॉर्ज सॅम्पाओली हे मैदानावरील आक्रमक शैलीमुळे ओळखले जातात आणि 2012 ते 2016 दरम्यान चिली संघासोबत त्यांनी याच शैलीच्या जोरावर अनपेक्षित निकाल नोंदवले होते. तशीच अपेक्षा अर्जेटिनासोबत त्यांच्याकडून बाळगल्या जात आहेत.
दुसरीकडे फ्रान्सचा संघ हा साखळी फेरीतील त्यांच्या आतापर्यंतच्या कामगिरीवरून बलाढय वाटत आहे, परंतु खेळाडूंचा योग्य वापरच त्यांना यश मिळवून देऊ शकतो. गटातून बाद फेरी गाठण्यासाठी ते प्रमुख दावेदारापैकी एक होते. त्यांनी दोन विजय आणि एका अनिर्णीत सामन्यासह आपल्या गटात पहिल्या स्थानाची निश्‍चितीही केली. डिडिएर डेश्‍चॅम्पस यांच्या मार्गदर्शनाखाली फ्रान्सने 2016च्या युरो स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश केला. मात्र पोर्तुगालने त्यांना घरच्या प्रेक्षकांसमोर पराभूत केले. आता विश्‍वचषक स्पर्धेतील फ्रान्सचे यानंतरचे भवितव्य ऍलेक्‍सांड्रे लॅसेझेट, अँटोने ग्रिझमन आणि कायलिन मॅब्प्पे यांच्या कामगिरीवर अवलंबून असणार आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)