फिफा विश्‍वचषक : आज बेल्जियमसमोर इंग्लंडचे आव्हान

फिफा विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धा
तिसऱ्या स्थानासाठी आज लढत रंगणार

सेंट पीटर्सबर्ग: फिफा विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धेच्या सुरुवातीला ब्राझील, जर्मनी, अर्जेंटिना व पोर्तुगाल यांसारखे संघ विश्‍वचषकाचे प्रमुख दावेदार मानले जात होते, मात्र स्पर्धा जसजशी मध्याकडे वाटचाल करत होती, तसतसे इंग्लंड आणि बेल्जियमच्या संघांकडे प्रमुख दावेदार म्हणून पाहिले जाऊ लागले. मात्र विश्‍वचषकाच्या अंतिम टप्प्यात हे दोन्ही संघ उपान्त्य फेरीत बाहेर पडले आणि आता या दोन दावेदारांमध्ये तिसऱ्या क्रमांकासाठी महत्त्वपूर्ण लढत आज  (शनिवार) रंगणार आहे.

इंग्लंड आणि बेल्जियम हे दोन्ही संघ याआधी गटसाखळीत एकमेकांसमोर उभे ठाकले होते. त्यात बेल्जियमने इंग्लंडचा 1-0 असा पराभव करत गटातील अव्वल स्थान काबीज केले होते. उद्याच्या सामन्यातही इंग्लंडपेक्षा बेल्जियमचे पारडे अधिक जड मानले जात आहे. कारण बेल्जियमच्या संघाने संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण खेळाचे प्रदर्शन केलेच आहे, त्याचबरोबर त्यांच्या खेळाडूंनी संघासाठी बहुमोल कामगिरी नोंदवली आहे.

एडन हॅझार्ड, केव्हिन डी ब्रुयने, ड्राइज मेर्टेन्स, रोमेलू लुकाकू आणि ऍक्‍सेल वित्सेल या मातब्बर खेळाडूंच्या उपस्थितीत बेल्जियमने चांगली कामगिीर केली असली, तरी महत्त्वाच्या सामन्यांमध्ये गोल करण्यात येत असलेल्या अपयशामुळे त्यांना या कमकुवत बाजूचा फटका बसताना दिसून येत आहे. तर युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या इंग्लंडच्या संघाने विश्‍वचषक स्पर्धेतील सर्व सामन्यांमध्ये गोल करण्यात यश मिळवले आहे. मात्र, त्यांची बचावफळी काहीशी कमकुवत असल्याचे जाणवत आहे. त्यामुळेच उपान्त्य सामन्यात आघाडीवर असतानाही त्यांना पराभूत व्हावे लागले होते.

पहिल्या उपान्त्य लढतीत फ्रान्सने बेल्जियमला 1-0 ने नमविले. फ्रान्सने अप्रतिम खेळ करताना बाजी मारली. बेल्जियमचे खेळाडू सामन्यानंतर अत्यंत निराश झाले. “फ्रान्सने अत्यंत बचावात्मक खेळ केला आणि हे खेळासाठी योग्य नाही, अशी प्रतिक्रिया बेल्जियमच्या खेळाडूंनी दिली. पण ही प्रतिक्रिया पटण्यासारखी नव्हती. फ्रान्सने उत्कृष्ट तांत्रिक खेळ केला. त्यांची आघाडीची फळी अत्यंत मजबूत आहे. एमबाप्पेसारखा अत्यंत प्रतिभावान खेळाडू त्यांच्याकडे आहे.

फ्रान्सचे पास देण्याचे कौशल्यही बघण्यासारखे होते. पण पासेस करणे म्हणजेच सर्व काही नसते. जेव्हा गोल करण्यात यश येते तेव्हाच सर्व गोष्टींना अर्थ असतो. फ्रान्सने सामन्यातील एकमेव व निर्णायक गोल करण्यात यश मिळवले आणि दिमाखात आगेकूच केली. तर दुसऱ्या उपान्त्य फेरीतील सामन्यात क्रोएशियाने 1-0 अशा पिचाडीवरून 2-1 असा विजय मिळवताना इंग्लंडचे विश्‍वचषक विजयाचे स्वप्न धुळीस मिळवले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)