फिफा विश्वचषक : ‘इजिप्शियन मेस्सी’ निवृत्ती पत्करणार?

नाराज मोहम्मद सलाहची निवृत्त होण्याची धमकी

व्होल्गोगॉड: आपल्या नावाचा राजकीय फायद्यासाठी वापर करून घेतला जात असल्याने नाराज झालेला अव्वल इजिप्शियन फुटबॉलपटू मोहम्मद सलाहने राष्ट्रीय संघातून निवृत्ती पत्करणार असल्याची भावना आपल्या संघातील सहकाऱ्यांजवळ बोलून दाखवल्याने इजिप्तच्या संघात एकच हलकल्लोळ माजला आहे. मात्र या वृत्ताला अधिकृत आधार मिळालेला नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

इजिप्त संघातील खेळाडूंनी पत्रकारांना माहिती दिली की, चेचेन नेता रमझान कॅडिरोव्ह याने सलाहच्या सन्मानार्थ दिलेल्या भोजन समारंभाच्या आयोजनाने तो चिडलेला आहे, कारण चेचेन नेता रमझानने सलाहला चेचेनचे नागरिकत्व बहाल करतानाच त्याच्या नावाचा वापर स्थानिक राजकारणासाठी करण्याची योजना आखली होती. तसेच रमझानवर मानवी हक्‍कांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहितीही इजिप्त संघातील दोन खेळाडूंनी नाव न छापण्याच्या अटीवर माध्यमांना दिली.

याबाबत बोलताना इजिप्त फुटबॉल संघटनेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सलाहने यासंदर्भात महासंघाकडे कोणत्याही प्रकारची तक्रार केलेली नसून या सर्व अफवा आहेत. तसेच सलाहच्या अधिकृत ट्‌विटर अकाऊंटवरील माहितीच खरी मानली जाईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. सलाहने अद्यापपर्यंत कोणतीही अधिकृत घोषणा केली नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

विश्‍वचषक स्पर्धेत सलाह अपयशी

सलाह हा शैलीदार खेळाडू आहे. अतिशय चपळ, वेगवान आणि चेंडूवर नियंत्रण ठेवण्याचे जबरदस्त कौशल्य त्याला लाभले आहे. तो खेळतो आक्रमण फळीत उजव्या बगलेवर; पण त्याची खरी ताकद आहे डाव्या पायानं तो फटकावत असलेल्या शॉट्‌समध्ये. त्याच्या कौशल्यामुळे त्याला “इजिप्शियन मेस्सी’ असेही म्हटले जाते. तर असा हा सलाह सर्व शकांवर मात करून विश्‍वचषक स्पर्धेत खेळला. चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्यात झालेल्या दुखापतीतून तो विश्‍वचषकापूर्वी सावरेल का, असाच प्रश्न होता.

सर्व शंका-कुशंकांवर मात करत सलाह संघाबरोबर रशियात पोचला; पण पहिल्या सामन्यात संघ व्यवस्थापनाने त्याला राखीव खेळाडूंत ठेवले. दुसऱ्या सामन्यात मात्र तो पहिल्या मिनिटापासून खेळला. रशियाने त्याला व्यवस्थित मार्क केले होते. त्यामुळे त्याला जागा बनवणे अवघड जात होते. दुसऱ्या सत्रात त्याच्यासाठी काही अवघड संधी निर्माण झाल्या; पण त्याला त्या साधता आल्या नाहीत. रशियानं तीन गोल केल्यानंतर इजिप्तचे खेळाडू मोठ्या त्वेषाने खेळले. पण तोवर उशीर झाला होता. त्यानंतर मिळालेल्या पेनल्टीवर सलाहने गोल केला. मात्र त्याच्या चाहत्यांना त्यापेक्षा त्याचा मैदानी गोल पाहायला निश्‍चितच आवडला असता.

आतापर्यंत एकच सामना खेळलेल्या सलाहवर प्रचंड दडपण आहे, कारण इजिप्तचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. स्पर्धेत दोन सामने होऊनही त्यांना एकही विजय मिळवता आलेला नाही आणि दोन पराभव स्वीकारावे लागले आहेत. त्यामुळे निदान शेवट तरी गोड करण्याचा त्यांचा प्रयत्न असणार. सलाहने खेळलेल्या एकमेव सामन्यात त्याला गोल करण्याच्या किमान तीन संधी मिळाल्या. मात्र त्याला त्याचे गोलमध्ये रूपांतर करण्यात अपयश आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)