फिफा विश्‍वचषक : इंग्लंडच्या पराभवाने पाठीराखे निराश

लंडन: विश्‍वचषकाचे दावेदार समजल्या जाणाऱ्या इंग्लंडच्या संघाला क्रोएशियाविरुद्धच्या उपान्त्य लढतीत 1-0 अशा आघाडीवरून 1-2 असा पराभवाचा सामना करावा लागला. विजयाच्या अपेक्षेने स्टेडियममध्ये आणि मायदेशात ठिकठिकाणी मोठ्या संख्येने जमलेले इंग्लंडचे पाठीराखे या पराभवामुळे भलतेच निराश झाले.

पराभवाने आम्ही अतिशय निराश झालो असलो, तरी आम्हाला आमच्या संघाचा अभिमान वाटतो, अशी प्रतिक्रिया लौरा रुसेन या 31 वर्षीय चाहतीने सामन्यानंतर दिली आहे. यावेळी इंग्लंडचे अनेक पाठीराखे निराश होऊन आपापल्या घरी परतत होते, तर काही चाहते संघाच्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल समर्थन देण्यासाठी तेथेच थांबले होते.

क्रोएशियाविरुद्ध उपान्त्य फेरीच्या सामन्यात ट्रिपियरनं पाचव्याच मिनिटाला गोल डागून इंग्लंडला आघाडी मिळवून दिली. त्यावेळी चाहत्यांनी इंग्लंडचा विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील प्रवेश निश्‍चित करून टाकला आणि जल्लोषाला सुरुवात केली. स्पर्धेपूर्वी इंग्लंडचा संघ उपान्त्य फेरीत प्रवेश करेल यावर विश्‍वास नसणारे चाहते आता विश्‍वचषक जिंकणार म्हणून जल्लोष करू लागले होते. मात्र पराभव झाल्यानंतर त्याच चाहत्यांचे चेहरे उतरलेले होते.

यावेळी मुराद हुसेनोव्ह नावाच्या चाहत्याने सांगितले की, हा सामना आमच्या साठी ऐतिहासिक होता. माझ्या संपूर्ण आयुष्यात पहिल्यांदाच इंग्लंडच्या संघाने विश्‍वचषकात इतक्‍या लांबचा पल्ला गाठला होता. जरी आमचा या सामन्यात पराभव झाला असला तरी आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो. 1990 मध्ये इंग्लंडचा संघ पराभूत झालेला पाहणारा शॉन बेली म्हणाला की, आमचा संघ त्यावेळी जर्मनीकडून पराभूत होउन परतला. आमच्याकडे त्यावेळचा आमचा स्टार खेळाडू पॉल गाझासारखा खेळाडू यावेळी नव्हता. मात्र यावेळी आमच्याकडे असा संघ आहे, जो भविष्यात आम्हाला विश्‍वचषक जिंकून देईल.

तत्पूर्वी, इंग्लिश पाठीराख्यांनी “इट्‌स कमिंग होम’ चा नारा सोशल मडियावर दिला होता. म्हणजे यंदा 52 वर्षांनंतर फिफा विश्वचषक घरी अर्थात इंग्लंडमध्ये येणार असा याचा अर्थ होता. मात्र साखळी फेरीत बेल्जियमकडून मार खाल्ल्यानंतर उपान्त्य फेरीत क्रोएशियासमोर इंग्लंडच्या संघाचा कमकुवत खेळ उघडा पडला आणि त्यांच्या पराभव झाला. या पराभवामुळेच त्यांच्यावर “गोईंग होम’ अशी वेळ आली आहे. यावरूनच नेटकऱ्यांनी इंग्लंड संघाला चांगलेच लक्ष्य केले असून अनेक ट्रोल्स रात्रीपासूनच इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)