फिफा विश्‍वचषक: क्रोएशिया अंतिम फेरीत, इंग्लंडचे स्वप्न उद्‌ध्वस्त

फिफा विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धा

मॉस्को: प्रत्येक क्षणाला श्‍वास रोखून धरायला लावणाऱ्या उपान्त्य लढतीत विश्‍वक्रमवारीत 20व्या स्थानावर असलेल्या क्रोएशियाने विजेतेपदाचा दावेदार असलेल्या इंग्लंडचे स्वप्न उद्‌ध्वस्त करताना फिफा विश्‍वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. क्रोएशियाने 0-1 अशा पिछाडीवरून आश्‍चर्यकारक पुनरागमन करताना ऐतिहासिक विजयाची नोंद केली. तब्बल 28 वर्षांनंतर उपान्त्य फेरी गाठणाऱ्या इंग्लंडला रिकाम्या हाताने मायदेशी परतावे लागले.

मध्यंतरापर्यंत इंग्लंडकडे 1-0 अशी आघाडी असलेल्या या लढतीत निर्धारित वेळेअखेर 1-1 अशी बरोबरी झाल्यामुळे सामना जादा वेळेत खेळविण्यात आला. जादा वेळेतील पूर्वार्धातही बरोबरी कायम राहिली परंतु जादा वेळेतील 109व्या मिनिटाला इव्हान पेरिसिकच्या पासवर मारिओ मान्झुकिकने निर्णायक गोल करताना क्रोएशियाच्या विजयाची निश्‍चिती केली. जेमतेम 40 लाखांच्या आसपास लोकसंख्या असलेल्या क्रोएशियाने फिफा विश्‍वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पहिल्यांदाच स्थान मिळविले आहे. येत्या रविवारी होणाऱ्या अंतिम लढतीत क्रोएशियासमोर माजी विजेत्या फ्रान्स संघाचे आव्हान आहे. फ्रान्सने दुसऱ्या उपान्त्य लढतीत बेल्जियमचे आव्हान परतवून लावले.

वास्तविक पाहता मध्यंतरापर्यंत आणि नंतर पूर्ण निर्धारित वेळेतही क्रोएशियाच्या खेळाडूंनीच खेळावर वर्चस्व गाजविले. इंग्लंडच्या 45 टक्‍क्‍यांच्या तुलनेत 55 टक्‍के वेळ चेंडूवर ताबा राखणाऱ्या क्रोएशियाने गोलक्षेत्रात गोलच्या दिशेने तब्बल 22 फटके लगावले. त्याच वेळी इंग्लंडला गोलक्षेत्रात केवळ 11 फटके गोलच्या दिशेने मारता आले. गोलक्षेत्राबाहेरही इंग्लंडच्या 5 फटक्‍यांच्या तुलनेत क्रोएशियाने 10 फटके गोलच्या दिशेने लगावीत सरस कामगिरी केली. क्रोएशियाने एकूण पासेसच्या संख्येत 590 विरुद्ध 497 आणि अचूक पासेसच्या संख्येत 474 विरुद्ध 379 अशी सरस कामगिरी केली.

तरीही पहिला गोल मात्र इंग्लंडने पाचव्याच मिनिटाला लगावला आणि सामन्यावर वर्चस्वही मिळविले. या वेळी क्रोएशियाचा कर्णधार लुको मॉड्रिकच्या चुकीमुळे इंग्लंडला मिळालेल्या फ्री किकवर कायरॉन ट्रिपियरने क्रोएशियाचा गोलरक्षक डॅनिजेल सुबेसिकला चकवीत अप्रतिम गोल केला. डेव्हिड बेकहॅमने 2006 मध्ये इक्‍वेडोरविरुद्ध केलेल्या गोलनंतर विश्‍वचषक स्पर्धेत फ्री किकवर इंग्लंडने थेट गोल करण्याची ही पहिलीच वेळ ठरली.

इंग्लंडने याआधी केवळ एकदा, 1966 मध्ये मायदेशात विश्‍वचषक जिंकला आहे. या वेळी इतिहासात केवळ दुसऱ्यांदा विश्‍वचषक उंचावण्यासाठी इंग्लंडची आगेकूच चालू असल्याचेच चित्र होते. परंतु ते होणे नव्हते. इव्हान पेरिसिकने 68व्या मिनिटाला सायमे व्हर्साल्कोच्या पासवर क्रोएशियाला 1-1 अशी बरोबरी साधून दिली, तेव्हा इंग्लंडच्या खेळाडूंना निराशा लपविता आली नव्हती. उरलेल्या वेळेत बरोबरीची कोंडी फोडण्यासाठी दोन्ही संघांनी आटोकाट प्रयत्न केले. इंग्लंडचा कर्णधार हॅरी केनचा गोलच्या अगदी जवळून केलेला प्रयत्न क्रोएशियाचा गोलरक्षक डॅनिजेल सुबेसिकने उधळून लावला.

अपेक्षेप्रमाणे सामना जादा वेळेत गेला. गेल्या दोन फेऱ्यांमध्ये डेन्मार्क आणि रशिया यांना पेनल्टी शूट आऊटमध्ये पराभूत करणाऱ्या क्रोएशियाला जादा वेळेची भीती वाटत नव्हती. त्याउलट पहिला गोल केल्यानंतर मोकळेपणाने खेळणाऱ्या इंग्लंडचे खेळाडू अचानक दडपणाखाली आल्याचे दिसत होते. क्रोएशियाच्या व्हर्साल्कोने जॉन स्टोनच्या हेडरवर अप्रतिम पास दिला. परंतु इंग्लंडचा गोलरक्षक जॉर्डन पिकफोर्डने उत्कृष्ट सेव्ह केला. अखेर 109व्या मिनिटाला पेरिसिकने दिलेल्या अविश्‍वसनीय पासवर मान्झुकिकने पिकफोर्डचा बचाव मोडून काढताना लक्ष्यवेध केला आणि क्रोएशियाच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)