फिफा विश्‍वचषक: इंग्लंडला नमवून बेल्जियम अग्रस्थानी 

बाद फेरीत बेल्जियम-जपान व इंग्लंड-कोलंबिया लढती रंगणार 
कॅलिनिनग्राड: “इंग्लंड आणि बेल्जियमचा पराभवासाठीच प्रयत्न’ असे मथळे जगभरातील प्रमुख वृत्तपत्रांनी दिलेल्या अत्यंत नीरस अशा लढतीत अखेर बेल्जियमने बाजी मारली. अदनान जानुजॅझच्या एकमेव गोलच्या जोरावर इंग्लंडचा 1-0 असा पराभव करताना बेल्जियमने फिफा विश्‍वचषक स्पर्धेतील जी गटात अग्रस्थानासह बाद फेरीत धडक मारली.
आता उपउपान्त्यपूर्व फेरीतील पहिल्या लढतीत बेल्जियमसमोर जपानचे आव्हान आहे. तर दुसऱ्या उपउपान्त्यपूर्व सामन्यात इंग्लंडला कोलंबियाशी झुंज द्यावी लागेल. परंतु बेल्जियमविरुद्धच्या सामन्यात पराभव पत्करल्यामुळे इंग्लंडने बलाढ्य संघांचा समावेश असलेल्या ड्रॉमधील स्थान टाळण्यात यश मिळविले. त्याउलट विजय मिळविणाऱ्या बेल्जियमच्या ड्रॉमध्ये ब्राझिल, फ्रान्स, अर्जेंटिना आणि उरुग्वे असे बलाढ्य व माजी विजेते संघ आहेत. तसेच बेल्जियमच्याच ड्रॉमध्ये युरोपियन विजेता पोर्तुगालचाही संघ आहे.
मध्यंतरापर्यंत गोलशून्य बरोबरीत चाललेल्या बेल्जियम-इंग्लंड सामन्यातील निकालाबद्दल कोणालाही उत्सुकता नव्हती. कारण या सामन्यातील पराभूत संघावर कोणतीही नामुष्की येणार नव्हती. उलट त्यांना सोप्या ड्रॉमध्ये स्थान मिळविता येणार होते. तसेच ट्युनिशिया व पनामा यांचे आव्हान अगोदरच संपुष्टात आले असल्याने व इंग्लंड-बेल्जियमने बाद फेरीतील प्रवेश याआधीच निश्‍चित केला असल्यामुळे या लढतीबद्दल कोणालाही औत्सुक्‍य नव्हते.
त्याआधी इंग्लंडचे प्रशिक्षक साऊथगेट यांनी या सामन्यासाठी संघात तब्बल 8 बदल केले. तर बेल्जियमचे प्रशिक्षक रॉबर्टो मार्टिनेझ यांनी त्याहीपुढे जाताना नऊ खेळाडू बदलले. बेल्जियमचे स्टार खेळाडू एडेन हॅझार्ड आणि केविन डी ब्रुईन यांच्यासह इंग्लंडचा कर्णधार हॅरी केनही मैदानाबाहेरून सामना पाहात होते.त्यामुळे पराभव ओढवून घेण्यासाठी कोणता संघ प्रयत्न करतो याचीच उत्सुकता होती.
परंतु उत्तरार्धातील 51व्या मिनिटाला युरे टिएलेमन्सच्या पासवर अदनान जानुजॅझने कोलंबियाचा विजयी गोल केला आणि इंग्लंडच्या समस्त पाठीराख्यांनी निश्‍वास सोडला. त्यानंतर इंग्लंडच्या खेळाडूंनी गोल करण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. इतकेच नव्हे तर इंग्लंडच्या प्रशिक्षकांनी बरोबरी साधण्यासाठी कोणताही प्रमुख खेळाडू मैदानात उतरविला नाही.
दरम्यान बेल्जियमचा दुखापतग्रस्त कर्णधार व्हिन्सेंट कंपनी याने या सामन्याच्या माध्यमातून पुनरागमन केले. व्हिन्सेंटे केवळ अखेरच्या 15 मिनिटांसाठीच मैदानात उतरला. परंतु त्याच्या केवळ अस्तित्वामुळेही बेल्जियमच्या खेळाडूंचे मनोधैर्य उंचावले होते. सामना संपण्यास 25 मिनिटे असताना रॅशफोर्डने इंग्लंडकडून गोल करण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न केला. परंतु त्यात काही दम नव्हता. आठ मिनिटे बाकी असतानाही वेलबेकचा अचूक फटका बेल्जियमचा गोलरक्षक फेलॅनीने उधळून लावला.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)