बारामती नगरपरिषद उपनराध्यक्षपदासाठी “फिल्डिंग’ ; अजित पवारांकडे इच्छुकांच्या येरझाऱ्या

बिरजू मांढरेंचा राजीनामा मान्य

बारामती: बारामती नगरपरिषदेतील विषय समित्यांच्या सभापतींची निवड झाल्यानंतर आता नगरपरिषदेत उपनगराध्यक्ष कोण होणार याकडे लक्ष लागले आहे. उपनगराध्यक्ष ची माळ आपल्या गळ्यात पडावी यासाठी नगरसेवकांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे फील्डिंग लावलली आहे. स्वीकृत नगरसेवकांसाठी देखील इच्छुकांची चुळबूळ सुरू झाले आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या सूचनांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बारामती नगरपरिषदेत पाच वर्षात पाच उपनगराध्यक्ष नेमण्याचा फॉर्मुला राष्ट्रवादीने आखला आहे. नाराज तसेच इच्छुकांना संधी देण्याचा त्याद्वारे प्रयत्न केला जात आहे. त्यानुसार नगरसेवक जय पाटील यांना उपनगराध्यक्षपदाची संधी प्रथम देण्यात आली परंतु एक वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला एक वर्षाच्या कार्यकाळात उपनगराध्यक्ष म्हणून त्यांची कारकीर्द चांगली राहिली मात्र पक्ष निर्णय असल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर नगरसेवक बिरजू मांढरे यांना उपनगराध्यक्ष करण्यात आले. त्यांचा एक वर्षाचा कार्यकाल संपल्याने त्यांनी नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला तो मान्य करण्यात आला. त्यानंतर नगरपरिषदेला तिसरा उपनगराध्यक्ष कोण मिळणार याकडे लक्ष लागले आहे. नगरसेवक जयसिंग देशमुख यांच्या नावाची उपनगराध्यक्षपदासाठी चर्चा आहे. जयसिंग देशमुख यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात निवडणूक लढवली होती.

माजी नगराध्यक्ष योगेश जगताप यांचा त्यांनी या निवडणुकीत पराभव केला होता. त्यानंतर काही महिन्यानंतर राजकीय समीकरणे बदलली आणि जयसिंग देशमुख यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्या पार्श्वभूमीवर देशमुख यांच्या नावाची चर्चा आहे. ज्येष्ठ नगरसेवक अशोक देशमुख यांचे ते पुत्र आहेत. अशोक देशमुख हे राष्ट्रवादी विरोधी नगरसेवक आहेत.

उपनगराध्यक्षपदासाठी आणखीनही नगरसेवक इच्छुक आहेत . त्यांनीदेखील अजित पवार त्यांच्याकडे फील्डिंग लावले आहे. उपनगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपला असल्याचे एका कार्यक्रमादरम्यान काही नगरसेवकांनी पवार यांच्या हे लक्षात आणून दिले .त्यानंतर एक वर्ष संपलं का अशी विचारणा पवार यांनी केली त्यानंतर उपनगराध्यक्ष मांढरे यांचा राजीनामा सादर झाला. नगरसेवक सत्यव्रत काळे, नवनाथ बल्लाळ, अतुल बालगुडे, कुंदन लालबिगे, समीर चव्हाण यांचादेखील इच्छुकांमध्ये समावेश आहे. असे असले तरी उपनगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात टाकायची याचे सर्वाधिकार अजित पवार यांच्याकडे असणार आहेत त्यामुळे उपनगराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष आहे.

स्वीकृत नगसेवक बदलणार?

स्वीकृत नगरसेवक म्हणून देखील इच्छुकांनी गर्दी केली आहे. निवडणुकीच्या रिंगणात ज्यांनी माघार घेऊन इतरांना संधी दिली त्यांना स्वीकृत नगरसेवकपदाची आशा लागली आहे. नगरपरिषदेत चार स्वीकृत नगरसेवक आहेत. उपनगराध्यक्ष पदाप्रमाणे स्वीकृत नगरसेवक देखील बदलले जाणार असल्याचे धोरण सुरुवातीला आखण्यात आले मात्र, एक वर्षाचा कार्यकाल संपल्यानंतरही स्वीकृत नगरसेवक बदलले गेले नाही. स्वीकृत नगरसेवकांच्या दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला असून आतातरी स्वीकृत नगरसेवक बदलले जातील या आशेने इच्छुक पाहत आहेत.

जुन्या-नव्यांचा ताळमेळ बसणार?

आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील विरोध कमी करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न सुरू आहे त्या अनुषंगाने काही विरोधकांचे प्रवेश देखील राष्ट्रवादीत झाले आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचे किशोर मासाळ यांचा प्रवेश देखील त्याच हेतूने राष्ट्रवादीत झाला आहे. त्यांना देखील संधी दिली द्यावी लागणार आहे. त्यांना संधी देत असताना निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे राष्ट्रवादीतील नवोदित आणि जुने निष्ठावंत यांचा ताळमेळ नेतेमंडळी कसा घालतात ते पाहणे औत्सुक्‍याचे ठरेल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)