सातारा – सातारा शहर वाहतूक शाखा आणि द फर्न रेसिडेन्सीच्या सहकार्याने साताऱ्यात हेल्मेट परिधान करुन दुचाकी चालविणाऱ्यांचा झाडांची रोपे देवून सत्कार करण्यात आला. यावेळी शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक घाडगे यांच्यासह द फर्न रेसिडेन्सिचे कर्मचारी उपस्थित होते.
“हेल्मेट परिधान करा व आपले जीवन सुरक्षित करा’, असा संदेश वाहतूक पोलिसांकडून नेहमीच देण्यात येत असतो. परंतु काही वाहनचालक हा संकेत पाळत नसल्यामुळे अपघातामध्ये अनेकांना हकनाक जीव गमवावा लागतो. परंतु यामधुनही काही वाहनचालक बोध घेत नाहीत. मात्र, काही सुजाण दुचाकी चालक मात्र हेल्मेट परिधान करुनच दुचाकी चालवतात.
अशा दुचाकी चालकांचा सन्मान करण्यासाठी सातारा शहर वाहतूक शाखा व द फर्न रेसिडेन्सिच्या सहाय्याने येथील बॉम्बे रेस्टॉरंटच्या चौकात हेल्मेट परिधान केलेल्या दुचाकी चालकांचा झाडाची रोपे देवून सत्कार करण्यात आला. या सत्कारामुळे अनेक हेल्मेट धारक दुचाकीस्वार मात्र भारावून गेले. रस्ते सुरक्षा व वृक्ष संवर्धनाचा संदेश यानिमित्ताने सातारा वाहतूक शाखेच्यावतीने देण्यात आल्यामुळे या अनोख्या उपक्रमाचे मात्र वाहनचालकांमधून कौतुक केले जात आहे.