छावण्या सुरू होत नसल्याने चारा व पाण्याविना जनावरांचा हंबरडा

जनावरे खाटकाच्या दावणीला बांधण्याची शेतकऱ्यांवर वेळ
पळशी – माण तालुक्‍यात यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती असून चारा व पाण्यासाठी जनावरांची तडफड सुरू आहे. पोटच्या मुलांप्रमाणे जीवापाड संभाळलेले पशुधन जगवायचे कसे? हा प्रश्‍न पशुमालकांसमोर उभा राहिला आहे. चारा व पाण्याअभावी चक्क जनावरांना कसायाच्या दावणींला बांधण्याची वेळ बळीराजावर आली आहे. मात्र गेंड्याची कातडी पांघरूण बसलेले प्रशासन छावण्या सुरू करण्याबाबत झोपेचे सोंग घेत आहे.

मंत्रिमंडळ उपसमितीच्या 24 जानेवारी रोजी पार पडलेल्या बैठकीत राज्यातील दुष्काळी भागात आवश्‍यकतेनुसार जनावरांना चारा व पाणी देण्यासाठी जनावरांच्या छावण्या सुरू करण्याचा निर्णय झाला. यावेळी तात्काळ छावण्या सुरू करण्याचे आदेश सरकारने दिले. तद्‌नंतर मराठवाड्यात अनेक ठिकाणी छावण्याही सुरू झाल्या असल्या तरी माण तालुक्‍यात अद्यापही छावण्या सुरू झाल्या नाहीत. तालुक्‍यात 72 हजार 303 मोठी जनावरे तर 16880 लहान जनावरे अशी एकुण शासकीय नोंदी प्रमाणे 89, 183 जनावरे आहेत. शासनाने छावण्या सुरू करण्याबाबत आदेश काढल्यानंतर तालुक्‍यातील सोसायट्या व अन्य संस्थानी छावण्या सुरू करण्यासाठी प्रांताधिकारी यांच्याकडे प्रस्ताव दाखल केले आहेत.

हे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गेले असून प्रथमतः 15 फेब्रुवारी पुर्वी प्रस्ताव दाखल करण्यास सांगितले होते. त्यावेळी 50 प्रस्ताव दाखल झाले होते. त्यानंतरही 30 प्रस्ताव दाखल झाले. जवळपास दीड महिन्यापासून प्रस्ताव प्रशासन दरबारी पडुन आहेत. छावणी सुरू होण्याबाबत आदेश झाला नाही. यासाठी इच्छुक संस्था चालक जिल्हाधिकारी कार्यालयात हेलपाटे घालत आहेत. सध्या आचारसंहिता असल्याचे कारण सांगितले जात आहे. मात्र 24 जानेवारीला निर्णय होऊनही आतापर्यंत प्रशासन काय करत होते? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)