कराड – येथील पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइनला गळती लावून त्यामध्ये दूषित पाणी मिसळल्याने परिसरात गॅस्ट्रोचा फैलाव झाला आहे. कुंभारवाडा परिसरात मुलांना गॅस्ट्रोची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने शहरात खळबळ उडाली होती. शहरात पाइपलाइनच्या कामामुळे जागोजागी खड्डे पडून त्यात पावसाचे, नाल्याचे पाणी साचल्याने दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नगरपालिकेने जर वेळीच योग्य त्या उपाययोजना केल्या नाहीत, तर शहरात गॅस्ट्रो सदृश्य रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रविवारी या परिसरातील काही मुलांना त्रास झाल्याने त्यांना वेणूताई चव्हाण शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तापासणी अंती त्यांना गॅस्ट्रोची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. गॅस्ट्रोच्या रुग्णांवर उपचार चालू असून या रुग्णांची संख्या सोमवारपर्यंत 20 वर पोहोचली आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून या साथीचा शहरातील अन्य भागात फैलाव होऊ नये, यासाठी नगरपालिका प्रशासन, आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे.
नगरपालिकेने जर वेळीच योग्य त्या उपाययोजना केल्या नाहीत, तर शहरात गॅस्ट्रो सदृश्य रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता नागरिकांमधून वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, कुंभारवाडा येथे दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोची लागण झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यासंदर्भात नगरपालिका आरोग्य अधिकाऱ्यांना संपर्क साधला असता आरोग्य अधिकाऱ्यांचा फोन नॉट रिचेबल लागत आहे.