एक जखमी; एसपींची जखमींना मदत
सातारा – काल शुक्रवारी सकाळी येथील रिमांड होम (बाल सुधारगृह) समोर होंडा सिटी कारचा भीषण अपघात झाला. जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्या गाडीला ओव्हर टेक करुन संबंधित गाडीतील युवक जुन्या आरटीओ चौकाकडे जात असताना त्यांचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी थेट वीज वितरण कंपनीच्या डीपी ला जावून धडकली. या अपघातात गाडीतील युवक जखमी झाले आहेत. जिल्हा पोलीस प्रमुख सातपुते यांनी तत्काळ गाडीतील जखमी युवकांना बाहेर काढले. दरम्यान, जिल्हा पोलीस प्रमुख सातपुते यांच्या तत्परतेचे सातारा जिल्ह्यात कौतुक होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, काल सकाळी साताऱ्यातील प्रणव संजय कुलकर्णी, सुरज मगर, कुमार जलवाणी हे युवक सदर बझार मधून जुना आरटीओच्या दिशेने निघाले होते. दरम्यान, याचवेळी सातारा जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते आपल्या शासकीय गाडीतून पोलीस परेडसाठी पोलीस परेड ग्राऊंडकडे निघाल्या होत्या. दरम्यान, रिमांड होम समोर जिल्हा पोलीस प्रमुखांच्या गाडीला ओव्हर टेक करण्याच्या नादात होंडा सिटी कार क्र. एमएच 11 बीएस 6831 या गाडीतील चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे ती गाडी रस्त्याच्या तिकाटण्यावर असलेल्या वीज वितरणच्या डीपी वर जावून धडकली.
ही धडक एवढी भीषण होती की, या गाडीने डीपीच्या अक्षरश: चिंध्या केल्या. गाडीची धडक बसल्यानंतर गाडी पलटी झाली. दरम्यान, अपघात झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर जिल्हा पोलीस प्रमुख सातपुते व त्यांच्या सोबत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी अपघातस्थळी धाव घेत जखमींना त्वरीत कारमधून बाहेर काढले व त्यांना उपचारांसाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले. सातारा शहर पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्हा पोलीस प्रमुख सातपुते यांनी अपघात झाल्यानंतर तत्काळ जखमी युवकांना बाहेर काढल्यामुळेच त्या युवकांचे प्राण वाचले आहेत. जिल्हा पोलीस प्रमुखांच्या या सतर्कतेचे जिल्हाभरातून कौतुक होत आहे.