भाजपच्या नगरसेवकांची शिष्टाई; लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे
श्रीगोंदा – भारतीय जनता पार्टीचे श्रीगोंदा शहराध्यक्ष दीपक शिंदे यांनी आज शिक्षण कॉलनी व शाहूनगर परिसरातील रस्ते व ड्रेनेज लाइनच्या प्रश्नासाठी नगरपरिषदेसमोर उपोषण केले. भाजप नगरसेवकांनी शिष्टाईची भूमिका घेतल्याने काही तासांतच पालिका प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्याने शिंदे यांनी उपोषण मागे घेतले.
शाहूनगर व शिक्षक कॉलनी परिसरातील मंजूर असलेल्या 250 मीटर रस्त्याचे मुरुमीकरण तत्काळ सुरू करावे. वरील भागात ड्रेनेज लाइनचे काम सुरू करावे. शिक्षण कॉलनी व शाहूनगर परिसर पक्क्या रस्त्यांना मंजुरी द्यावी, या मागण्यासाठी शिंदे यांनी उपोषण केले.
यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, गेल्या वीस वर्षांपासूनवरील भागातील प्रश्न प्रलंबित आहे. ड्रेनेज लाइन व पक्के रस्ते हा महत्त्वाचा विषय असून तेथील राहणाऱ्या किमान 400 कुटुंबास वारंवार त्रास होत आहे. प्रशासनाने त्वरित निर्णय घेऊन या परिसरातील प्रश्न सोडवावे व नागरिकांना या त्रासातून मुक्त करावे. अनेक नागरिकांनी व सामाजिक संघटनांनी शिंदे यांच्या उपोषणास उपस्थित राहून लिखित स्वरूपात पाठिंबा दिला.
याप्रसंगी नगराध्यक्षा शुभांगी पोटे, मनोहर पोटे, विश्वंभर दातीर, बापूसाहेब गोरे, एम. डी. शिंदे, उपनगराध्यक्ष अशोक खेंडके, पोपट खेतमाळीस, सतीश पोखरणा, नगरसेवक संतोष खेतमाळीस, शाहजी खेतमाळीस, भाऊसाहेब खेतमाळीस, नंदकुमार लाढाणे, सुधीर खेडकर, सतीश मखरे, संतोष कोथिंबिरे, प्रशांत गोरे, अरविंद राऊत, सतीश बोरुडे, दत्ता जगताप, प्रा. विजय शेलार आदी उपस्थित होते.
शिक्षक कॉलनी व शाहू नगर परिसरातील रस्त्याचे वर्कऑर्डर काढण्यात आले आहेत. आजच्या आज लेआउट करून घेण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. ड्रेनेज लाईनचे इस्टीमेट काढून ते देखील काम लवकरच मार्गी लागेल.
शुभांगी पोटे , (नगराध्यक्ष, श्रीगोंदा नगरपरिषद)