साकळाई पाणी योजनेसाठी 9 ऑगस्टपासून उपोषण : दीपाली सय्यद

नगर – मुख्यमंत्री व खासदार सुजय विखे आता साकळाईबाबत काही बोलत नाहीत. पण योजना होईपर्यंत मी शांत बसणार नाही. त्यासाठीच येत्या 9 ऑगस्ट क्रांती दिनापासुन मी उपोषणास बसणार आहे, अशी माहिती अभिनेत्री व शिवसंग्राम पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष दीपाली सय्यद यांनी दिली आहे.

नगर व श्रीगोंदे तालुक्‍यातील 335 गावांसाठी वरदान मानल्या जात असलेल्या साकळाई पाणी योजनेला पर्यायी योजना देऊन संबंधित गावांना हक्काचे पाणी मिळवून देऊ शकते,’ असा दावा सय्यद यांनी केला. दरम्यान, साकळाई योजनेसाठी येत्या 9 ऑगस्टला उपोषण आंदोलन करण्याचा निर्णय कायम असून, त्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

2014 मध्ये आम आदमी पक्षाकडून लोकसभेची नगर मतदारसंघाची निवडणूक लढवून चर्चेत आलेल्या दीपाली यांनी आता श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केल्याचे सांगितले जाते. या पार्श्‍वभूमीवर श्रीगोंदे व नगर तालुक्‍यातील 35 गावासाठी लाभदायी ठरणाऱ्या साकळाई पाणी योजनेचा प्रश्‍न त्यांनी हाती घेतला आहे. यासाठी त्यांनी मध्यंतरी रस्ता रोको आंदोलनही केले होते व आता येत्या 9 ऑगस्टला जिल्हा परिषदेत उपोषण आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे.

साकळाई योजनेवर फक्त राजकारण सुरू आहे. निवडणुकीपुरती यावर चर्चा होते व त्यानंतर पुढे काहीच होत नाही. श्रीगोंद्यातील काही भाग जसा हरित आहे, तसा साकळाई गावासह रुईछत्तीशी, वाळकी, गुंडेगाव परिसरातील भागही साकळाई योजनेने हरित होऊ शकतो, पण यासाठी आता पाणी नसल्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन सांगतात व दुसरीकडे मुख्यमंत्री वाळकीच्या सभेत महिनाभरात या योजनेचे काम मार्गी लावण्याची ग्वाही देतात, अशी परस्परविरोधी वक्तव्ये चुकीची आहेत.

शिवाय खासदार डॉ. विखे देखील यावर आता काही बोलत नाहीत’, अशी टीका करून सय्यद म्हणाल्या, साकळाई योजना होत नसेल तर तिला दुसरा पर्याय काय, यावर कोणी बोलत नाही. मात्र, आपण साकळाईला पर्यायी योजना तयार केली आहे, तिचा आराखडाही तयार केला आहे. प्रस्तावित उपोषण आंदोलनाआधी मुख्यमंत्र्यांना भेटून तो त्यांना देणार आहे व 9 ऑगस्टला उपोषणस्थळी तो जाहीर करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)