“अमूल’चा दिलासा : हंगामातील चौथ्यांदा दूध खरेदी दरात वाढ
नाणे मावळ – अमूल दूध संघाकडून गाय आणि म्हैसच्या दूध खरेदी दरात चालू हंगामात चौथ्यांदा दरवाढ करण्यात आली आहे. मागील काही काळात राज्यातील दूध संघाने दूध खरेदी दरात वाढ करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. गुरुवारपासून (दि. 11) ही दरवाढ लागू झाली आहे. या दरवाढीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या दूध व्यवसायाला उभारी मिळण्यास मदत होणार असून, मावळातील अंदाजे दीड-दोन हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे.
अमूल दूध संघाकडून गाय आणि म्हैसच्या दूध खरेदी दरात वाढ केली आहे. “अमूल’तर्फे या हंगामात चौथ्यांदा दरवाढ करण्यात आली आहे. उन्हाळ्यातील राज्याची दुष्काळस्थिती पाहता दूध संघाने दूध खरेदी दरात वाढ करून शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा देणारा निर्णय घेतला होता.
“अमूल’ने यापूर्वी 10 एप्रिल, 25 एप्रिल आणि 11 जून अशी तीनवेळी दूध खरेदी दरात वाढ केली. आता नव्याने 11 जुलैपासून आणखी एक नवी दरवाढ केली आहे. यावर्षी दुधाच्या दरात तब्बल सहा रुपयांची भरघोस खरेदी दरवाढ करीत “अमूल’ने दूध खरेदी दरात मोठी स्पर्धा निर्माण केल्याचे पाहवयास मिळते.
दहा एप्रिल ते आजपर्यंत एकूण सहा रुपयांची वाढ दिली आहे. नव्या दरानुसार गायीचे दूध प्रतिलिटर 28 रुपये, तर म्हैसचे दूध 41 रुपये दराने खरेदी करण्यात येणार आहे. “अमूल’च्या या निर्णयाने दूध खरेदी दराची स्पर्धा आणखी वाढणार आहे. पर्यायाने आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, यात शंका नाही. “अमूल’ची दूध दरवाढ महाराष्ट्रासह गुजरात राज्यात 11 जुलैपासून लागू करण्यात आली आहे. “अमूल’च्या दरवाढीने राज्यातल्या सर्वच संघांना दर खरेदीच्या दरात वाढ करण्यासाठीचा दबाव राहिल, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.
पुणे जिल्ह्यातील 139 संकलन केंद्र आहेत. मावळात कामशेत, सदुंबरे, नायगाव, इंदोरी, काले कॉलनी (पवनानगर), शिवणे, गहुंजे, दारूंब्रे या ठिकाणी दूध शीतकरण केंद्र आहेत. या भागातून सरासरी 12 ते 15 हजार लीटर दूध “अमूल’कडे संकलीत केले जाते. त्यामुळे तालुक्यातील सुमारे दीड-दोन हजार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. याशिवाय सातारा, पुणे, ठाणे, पालघर आणि नाशिक या पाच जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून अमूल दूध खरेदी केली जाते.
अमूल दूध संघाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. यापूर्वीही, अमूल कंपनीने दुधाच्या दरामध्ये वाढ केली होती. आर्थिक संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याच्या उद्देशाने “अमूल’ने दूध खरेदी दरात 10 रुपयांनी वाढ केली होती. कंपनीच्या या निर्णयामुळे अमूल डेअरीशी संलग्न असणाऱ्या एक हजार 200 दूध संघटनांमधील सात लाख शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे.
महागाईच्या काळात गाई-म्हैस सांभाळणे फार कठीण होऊन बसले आहे. अशा परिस्थितीमध्ये “अमूल’ने दुधाचे दर वाढवणे ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे. संपूर्ण महाराष्ट्रात अनेक दूध संघ असताना दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम “अमूल’ करीत आहेत. बाकीचे संघ अपापसात भांडताना दिसतात. येथून पुढील काळात “अमूल’ने अधिकाधिक दुधाची उत्पादने तयार करून शेतकऱ्यांच्या दुधाला सदैव अधिकचा दर कसा मिळेल, असा प्रयत्न केला पाहिजे. सध्या तरी अन्य दूध संघांपेक्षा “अमूल’ अधिक दर आहे.
– अविनाश शिंदे, दूध उत्पादक शेतकरी.
“अमूल’ने मागील काही दिवसांपूर्वी दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. तत्पूर्वी “अमूल’ने 10 एप्रिल ते आजपर्यंत दूध खरेदीच्या दरात एकूण सहा रुपयांची घसघशीत वाढ दिली आहे. ग्राहकांची दरवाढ यापूर्वीच झाली आहे. या वाढीचा ग्राहकांवर ताण येणार नाही. दरवाढीचा निर्णय दूध उत्पादकाच्या दृष्टीने घेण्यात आला आहे.
– डॉ. अनिल कवटेकर, महाव्यवस्थापक, अमूल दूध.