सहापदरीकरणाच्या मोजणीचे काम शेतकऱ्यांनी रोखले

उंब्रज – महामार्गाच्या सहापदरी करणात नव्याने जमीनी जाण्याच्या भितीने धास्तावलेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी वहागाव येथे सुरू होणारे मोजणीचे काम बंद पाडून अधिकाऱ्यांना घेराव घातला. मनमानी पध्दतीने मोजणीचे खांब मोजणीपूर्वीच रोवले कसे असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी व्यक्त केला. तसेच तासवडे टोलनाक्‍याच्या रुंदीकरणासाठी एक गुंठाही जागा देणार नसल्याची भूमिका वराडे व तासवडे येथील शेतकऱ्यांनी घेतली.

राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरणाने या परिसरातील शेतकरी हवालदिल झाला असून रस्ता रुंदी करणासाठी शेतजमिनी व घरे देणार नाही. मनमानी पद्धतीने शेतकऱ्यांच्या शेतजमिनी बळकावण्याचे काम संबंधितांकडून सुरू असल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला. वेळप्रसंगी रास्ता रोको आंदोलन करण्याची भूमिका यावेळी शेतकऱ्यांनी घेतली.

याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रीय प्राधिकरण विभागाने दोन दिवसांपूर्वी वहागाव येथील शेतकऱ्यांना नोटीसा बजावून तातडीने मोजणी करण्यासाठी हजर राहण्याचे सुचित केले. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी मोजणी रोखण्याचा निर्णय रविवारी झालेल्या बैठकी दरम्यान घेतला. त्यानुसार सोमवारी सकाळी वहागाव येथे सुरू होणारी मोजणी शेकडो शेतकऱ्यांनी उपस्थित राहून रोखली. यावेळी वराडे, तासवडे, बेलवडे हवेली, वनवासमाची, खोडशी, मुंढे, गोटे येथील शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधितांकडून काही ठराविकच शेतकऱ्यांना नोटिसा बजावल्या गेल्या मात्र शेजारच्या बाधित शेतकऱ्यांना मोजणीपासून अनभिज्ञ ठेवण्याचा प्रकार सोमवारी शेतकऱ्यांनी हाणून पाडला. शेतकरी व मिळकत धारकांना विश्वासात न घेता त्यांच्या क्षेत्रात मागील महिन्यात दगड लावले गेले आहेत. हे दगड मुख्य महामार्गापासून अडीचशे ते तीनशे मीटर शेतात रोवले गेल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. खरेतर पंधरा दिवसापूर्वी शेतकऱ्यांना नोटिसा देणे गरजेचे असताना दोनच दिवसांपूर्वी नोटीस देऊन त्यानंतर तातडीने मोजणी करण्याचा निर्णय संबंधित विभागाने कसा घेतला यावरून मोठी नाराजी शेतकऱ्यांनी व्यक्त केली. तसेच सहा पदरीकरणाच्या कामामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होऊन रस्त्यावर येण्याची वेळ येणार आहे. तसेच त्यांना मिळणाऱ्या मोबदल्याविषयी संभ्रमावस्था आहे.

संबंधित विभागाकडून कोणतीही अधिकृत माहिती दिली जात नाही. त्यामुळे सोमवारी मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना घेराव घातला. यावेळी शेतकऱ्यांनी भुसंपादनाला विरोध दर्शवत प्रसंगी आक्रमक भूमिका घेण्याचे स्पष्ट केले. कोणत्याही परिस्थितीत सहापदरी कामासाठी नव्याने भूसंपादन करू देणार नाही. शेतकऱ्यांना यासंदर्भात पुरेशी माहिती दिली गेलेली नाही. तसेच महामार्गालगतच्या बहुतांशी शेतकऱ्यांच्या जमिनी व घरे यापुर्वीच चौपदरीकरणाच्या कामात गेली आहेत. त्यामुळे नव्याने जमिनी दिल्या जाणार नाहीत, असा इशारा दिला.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांवर अन्याय केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला.
दरम्यान शेतकऱ्यांनी याबाबत जिल्हाधिकारी, भूमी अभिलेख, रस्ते विकास महामंडळ, पोलीस उपअधिक्षक यांना यासंदर्भात निवेदन दिले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)