हिंगणगावच्या शेतकऱ्यांचे उपोषण सातव्या दिवशी मागे

सातारा – बनावट कुलमुख्त्यारपत्र तयार करुन हिंगणगाव (ता. फलटण) येथील शेतकऱ्यांची 242 एकर जमीन फसवणूक करुन हडपणाऱ्यांची चौकशी करण्याच्या मागणीसाठी सुरु असलेले 21 खातेधारकांचे उपोषण सातव्या दिवशी मागे घेण्यात आले. स्वाभिमानी रामोशी महासंघाच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सौ. प्रियाताई नाईक व संस्थापक सदाशिवराव नाईक यांच्या हस्ते लिंबू सरबत घेवून आंदोलनकर्त्यांनी या उपोषणाची सांगता केली.

हिंगणगाव येथील जुन्या सर्व्हे क्रमांक 356 व 377 आणि शेतजमिनीचे नवे गट क्रमांक 1443 ते 1627 दरम्यानची रामोशी समाजातील खातेदारांची 142 एकर शेतजमिन गावातील व बाहेरील काही व्यक्तींनी गैरफायदा घेत त्यापैकी काही जणांना हाताशी घेत आणि चुकीची माहिती देवून संबंधितांनी त्यांची फसवणूक केली होती. वेळोवेळी याबाबत शासनदरबारी दाद मागूनही हा प्रश्‍न मार्गी लागत नव्हता. आणि त्यामुळे या जमिनीच्या मूळ मालक असणाऱ्या गोरगरीब शेतकऱ्यांची फरफट होत होती. जमिनीचे मालक असूनही त्यांच्यावर रोजगार आणि रोजी रोटीसाठी भटकंती करण्याची वेळ येवून ठेपली होती. त्यामुळे सात मार्चपासून संबंधित शेतकऱ्यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले होते. मात्र जिल्हा प्रशासनाकडून त्याची काहीही दखल घेतली जात नव्हती.

सर्वच उपोषणकर्ते आंदोलक वयोवृद्ध असल्याने आणि त्यांना रक्तदाब, मधुमेह आदी आजारांनी घेरल्याने उपोषण सहन न झाल्याने तिसऱ्या दिवसांपासूनच सात ते आठ जणांची प्रकृती खालावली होती. मात्र तरीही या उपोषणाची दखल घेतली जात नव्हती. त्यामुळे स्वाभिमानी रामोशी महासंघाच्या राज्याध्यक्षा सौ. प्रियाताई नाईक यांनी याप्रश्‍नी मध्यस्थी केली व जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात याबाबत आंदोलकांच्या शिष्ठमंडळासमवेत बैठक घेतली. त्यावेळी विधी व प्राधिकरण कार्यालयास दूरध्वनीद्वारे कागदपत्रांची पडताळणी करुन योग्य तो अहवाल तातडीने देण्याचे आदेश दिले. त्याबाबत सकारात्मकता वाटल्याने सातव्या दिवशी हे आंदोलन मागे घेण्यात आले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)