पाण्याची पातळी खालावल्याने शेतकरी हवालदिल

बागा काढण्याशिवाय पर्याय नाही; शेतकऱ्यांना कोट्यवधींचा फटका
अकराशे हेक्‍टर डाळींब बागांचे पाण्याअभावी सरपण
संगमनेर  –संगमनेर तालुक्‍यातील पाण्यापासून सातत्याने वंचित असलेल्या तळेगाव व पठार भागात भीषण दुष्काळीस्थिती निर्माण झाली आहे. भीषण पाणी टंचाईने अकराशे हेक्‍टर क्षेत्रातील डाळींब बागा पाण्याअभावी वाळून गेल्या आहेत. या बागा काढण्याशिवाय कोणताही पर्याय राहिलेला नाही. यामुळे या शेतकऱ्यांना कोट्यवधीचा फटका बसला आहे.

संगमनेर तालुक्‍यात डाळिंबाचे जवळपास 3 हजार 570 हेक्‍टर क्षेत्र आहे. पठार भागातील साकुर, जांबूत, पिंपळगाव देपा, नांदूर खंदरमाळ, आंबी-दुमाला, बोटा, अकलापूर, आभाळवाडी, वरुडीपठार, सारोळेपठार, भोजदरी तर तळेगाव भागातील निमोण, सोनोशी, पिंपळे, चिंचोली गुरव, चोरकौठे, तिगाव, कौठे कमळेश्‍वर, वडझरी या दुष्काळी भागात डाळिंबक्षेत्र अधिक आहे. या भागातील शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन, शेततळे, कूपनलिका खोदून उजाड माळरानावर डाळिंबांच्या बागा फुलविल्या आहेत. विकत पाणी घेणे शक्‍य नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांना यंदा नाइलाजाने डाळिंबाच्या झाडावर कुऱ्हाड चालवावी लागेल, अशी शंका शेतकरी वर्तवित आहेत.

बाग लावताना लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला. ठिबक सिंचन संच, औषधी यांवर बराच पैसा गेला, मात्र आता मोठे झालेल्या झाडांचे दुष्काळामुळे सरपण झाले असल्याने शेतकरी हतबल झाले आहे. शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून डाळिंबाची मोठ्या प्रमाण लागवड केली होती. फळबाग उत्पन्नासाठी किमान पाच वर्षे वाट पाहावी लागते. परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे फळबागातून कोणतीही उत्पन्न निघाले नाही. जमिनीतील पाण्याची पातळी 800 ते 1000 फुटापर्यंत खोल गेली आहे. विहिरी, कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. यासाठी लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला असून, शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत.

पाण्याअभावी फळबाग जगवणे अवघड झाले आहे. विहिरीत पाणी नाही. विकत पाणी परवडत नसल्याने, फळबागावर कुऱ्हाडच चालवण्याची वेळ आली. डाळींब बागाचे सरपण झाल्याने तीन हजार झाडे काढून टाकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे फळबागांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्‍टरी दीड लाखांपर्यंत ठोस मदत द्यावी. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.

जयराम ढेरंगे, पिंपळगाव देपा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)