धान्य व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक

-धान्याला आधी मग पैशाला कधी?
-शेतकऱ्यांच्या जिवावर व्यापाऱ्यांचे इमले
-प्रशांत जाधव

सातारा – दुष्काळ व इतर नैसर्गिक आपत्तीने होरपळत, पोटच्या गोळ्याप्रमाणे पिक सांभाळणाऱ्या शेतकऱ्यांची व्यापारी वर्गाकडून मोठी फसवणूक सुरु आहे. शेतकऱ्याने व्यापाऱ्यांना विकलेल्या धान्याचे पैसे रोखीने देणे गरजेचे असताना, व्यापारी शेतकऱ्यांना धान्य खरेदी केल्यापासून दहा ते पंधरा दिवसाच्या मुदतीनंतर पैसे घेण्यास या असे फर्मान सोडत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली आहे.

कायम दुष्काळी असलेल्या खटाव माण तालुक्‍यातील शेतकरी नैसर्गीक तसेच इतर आपत्तीवर मात करून जगण्याचा संघर्ष करत आहे. जिथे पिण्याला पाणी नाही, अशा दुष्काळी तालुक्‍यातील शेतकरी काहीच नाही जमले तर किमान आपल्या शेतात ज्वारी, बाजरी ही कमी पाण्याची पिके घेत आहे. अतंत्य प्रतिकूल परिस्थितीमध्ये पिकवलेल्या धान्याला चांगला बाजारभाव मिळाल्यावर शेतातील खर्च व कुटुंबांच्या गरजा भागवण्याची स्वप्ने पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या टाळुवरचे लोणी खाण्याचा घाणेरडा प्रकार सध्या खटाव तालुक्‍यातील काही व्यापाऱ्यांकडून सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

खटाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील एका शेतकऱ्याने गेल्या आठवड्यात वडूज येथील एका धान्य व्यापाऱ्याला शेतातील ज्वारीची सुमारे दहा ते पंधरा पोती विकली. त्या शेतकऱ्याला पैशाची अतंत्य गरज असल्याने त्याने थेट खळ्यातूनच ज्वारीची पोती वडूजला विकण्यासाठी नेहली होती. मात्र वडूजला पोहचल्यावर व्यापारी महाशयांनी दिलेली चिठ्‌ठी पाहून त्या शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणीच तरळले. त्याचे कारणही तसेच होते, विकेलेल्या पोत्यांचे बाजारभावाने पैसे मिळतील या आशेने आलेल्या त्या शेतकऱ्याच्या हातात एक चिठ्‌ठी पडली. त्या चिठ्ठीवर व्यापाऱ्याने विकत घेतलेल्या ज्वारीचे वजन व बाजारभावाने (?) झालेली त्या धान्याची किंमत लिहुन पुढील दहा दिवसानंतर पैसे घेण्यास येण्याचे लिहले होते.

व्यापाऱ्याने दिलेल्या चिठ्ठीमुळे हतबल शेतकऱ्याने जाब विचारताच आम्हाला तुमच्या मालाची गरज नाही. कुणाला विकायचा त्याला विका असे सांगण्यात आले. हे एक प्रातिनिधीक उदाहरण आहे, मात्र हा प्रकार सर्रास होताना दिसत आहे. मात्र व्यापाऱ्यांनी धान्य खरेदी केले नाही तर लोकांची देणी कशी भागवायची या भितीने शेतकरी व्यापाऱ्यांची मुजोरी सहन करत आहेत.

शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण थांबविण्यासाठी शासनाने शेती उत्पादीत प्रत्येक मालाचे हमी भाव जाहीर केले. हमी भावापेक्षा कमी दराने शेतकऱ्यांचा माल खरेदी करणाऱ्या व्यापारी किंवा यंत्रणेवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तरतूद पणन व विनियमन अधिनियमात केली आहे. तरीही कायद्याला न जुमानता वडूज येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापारी शेतकऱ्यांकडून माल खरेदी करताना लूट करत आहेत. हा सगळा प्रकार बाजार समितीचे प्रशासन, पदाधिकारी, शासनाचे प्रतिनिधी उघड्या डोळ्यानी पाहत आहे. मात्र शेतकऱ्यांचा कैवार घेण्याची कोणाचीही हिम्मत होताना दिसत नाही.

बाजार समितीचा कर्मचारी व्यापाऱ्यांचा दलाल?

खटाव तालुक्‍यातील शेतकऱ्यांची व्यापारी फसवणूक करत असल्याची कुणकुण जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत एका सामाजिक कार्यकर्त्याने पोहचवली. त्यानंतर कार्यतत्पर जिल्हाधिकाऱ्यांनी लागलीच अधिकाऱ्यांना कामाला लावले. त्यानंतर खटाव तालुका बाजार समितीच्या कर्मचाऱ्याने मोघमपणे एका शेतकऱ्याच्या घरी जात, कशाला तक्रारी करता, परत तुमचे धान्य कुणीच व्यापारी खरेदी करणार नाही. अशी भीती दाखवत आपली त्या व्यापाऱ्यांच्याप्रती असलेली निष्ठा दाखवुन दिल्याने बाजार समितीचा तो कर्मचारी व्यापाऱ्यांचा दलाल तर नाही ना? असा सवाल शेतकऱ्याच्या मनात निर्माण झाला.

अधिकाऱ्यांच्या मुंग्या कधी उतरणार?

खटाव तालुक्‍यातील व्यापारी नेमके काय दिवे लावतात हे पाहण्याची ज्यांची जबाबदारी आहे ते अधिकारी नेमके काय करतात? जसे पतसंस्थाच्या भानगडी, व्यापाऱ्यांची हुजरेगिरी केली जाते. त्याप्रमाणे शासन ज्या शेतकऱ्यांसाठी पगार देते, त्या शेतकऱ्यांच्या हितासाठी या अधिकाऱ्यांनी आपली बुध्दी वापरावी अशी मागणी होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्यावर कारवाईचे सोंग घेणाऱ्या संबंधीत अधिकाऱ्यांच्या मुंग्या नेमक्‍या कधी उतरणार? असा संतप्त सवाल विचारला
जात आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)