माती परीक्षण केंद्र उभारणार -राजेंद्र नागवडे

नागवडे कारखाना कार्यस्थळावर ऊस पीक परिसंवाद, शेतकरी मेळावा

श्रीगोंदा – तालुक्‍यातील ऊसाचे सरासरी उत्पन्न हेक्‍टरी 40 टन आहे. ऊसाच्या उत्पादनात वाढ होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनसारख्या आधुनिक पद्धतींचा अवलंब करावा. शेतीच्या पद्धतीत बदल करण्यासाठी कारखाना कार्यस्थळावर माती परीक्षण केंद्र उभारणार असल्याचे “नागवडे’ कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी सांगितले. उसाला अधिकाधिक बाजारभाव मिळावा याला आम्ही देखील सहमत आहोत. शेतकऱ्यांनी सरासरी उत्पन्नात वाढ केल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल, असेही नागवडे म्हणाले.

तालुक्‍यातील ढोकराई येथील प्रगती मंगल कार्यालयात रविवारी “नागवडे’ कारखान्याच्या वतीने ऊस पीक परिसंवाद व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कारखान्याचे उपाध्यक्ष केशवराव मगर यांनी प्रास्ताविक केले.

डॉ. हरिहर कौसडीकर म्हणाले, शेतकऱ्यांना मातीचे महत्त्व समजायला उशीर झाला. तोपर्यंत जमिनीचे मोठे नुकसान झाले. पिकाचे उत्पन्न वाढविण्यासाठी मातीचे आरोग्य जपणे महत्वाचे असते. पिके घेताना जमिनीतील अन्नद्रव्यांचा उपसा होतो, परिणामी शेतीची उत्पादन क्षमता घटते. पिकांसाठी पाण्याचा अतिरिक्त वापर केल्याने मातीच्या आरोग्याचे अनेक प्रश्न उद्‌भवतात. शेती व्यवसायामध्ये आरोग्यसंपन्न माती हेच मुख्य भांडवल असल्याचे डॉ. कौसडीकर यांनी सांगितले.
प्रगतशील ऊस शेतकरी संजीव माने म्हणाले, सुरुवातीला माझेही ऊसाचे उत्पादन एकरी 30 टनाच्या घरात होते. मात्र सेंद्रियशेती, ठिबक सिंचन आणि तंत्रज्ञान राबवून सन 1995 साली एकरी सरासरी 86 टन ऊसाचे उत्पादन घेतले.

सन 1998 साली एकरी 100 टन ऊस उत्पादनाचे उदिष्ट गाठले. येत्या काळात एकरी 200 टन ऊसाचे उत्पादन घेण्याचे आमचे ध्येय आहे. जमिनीची सुपीकता, पाणी व्यवस्थापन, पीक संरक्षण, शेणखत या गोष्टी उत्पादन वाढीत सर्वाधिक महत्वाच्या असल्याचे माने म्हणाले. ऊसाचे उत्पादन वाढविण्यासाठी मातीत कार्यक्षम जिवाणू असणे गरजेचे आहे.

“जैन ठिबक’चे सुरेश मगदूम म्हणाले, ठिबक सिंचन ही काळाची गरज बनली आहे. ठिबक सिंचनमुळे पाण्याची 50 टक्के बचत होते. जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते. ऊसासाठी केलेल्या ठिबकवर इतर ही पिके घेतली जाऊ शकतात. ठिबक सिंचनचा वापर केल्याने खतांची बचत होते.
कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत दरेकर, जिजाबपू शिंदे, प्रेमराज भोईटे, अरुण पाचपुते, सुभाष शिंदे, युवराज चितळकर, विजय कापसे, ऍड अशोक रोडे, कार्यकारी संचालक रमाकांत नाईक, शेतकी अधिकारी शशिकांत आंधळकर, बाबासाहेब इथापे आदी उपस्थित होते. प्रा. शंकर गवते यांनी सूत्रसंचालन केले तर यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)