कॉंग्रेसकडून खोट्या बाबींचा प्रसार-भाजपचा पलटवार 

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत पराभव होणार असल्याची जाणीव झाल्याने कॉंग्रेस पक्ष अस्वस्थ बनल्याचे दिसते. त्यातून महात्मा गांधींच्या भूमीतून कॉंग्रेसकडून खोट्या बाबींचा प्रसार केला जात आहे, असा पलटवार भाजपने केला.

गुजरातच्या अहमदाबादमध्ये कॉंग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक झाली. त्या बैठकीत मोदी सरकारला लक्ष्य करण्यात आले. त्याबरोबरच कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी जाहीर सभेतही सरकारवर टीकेची झोड उठवली. त्याचा समाचार भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी घेतला. गांधीजींपेक्षा ते गांधी (राहुल आणि प्रियांका) वेगळे आहेत. गांधीजींनी सत्याचा मार्ग अवलंबला. तर दुसरे गांधी असत्याचे अनुसरण करत आहेत. राफेल व्यवहारात मोदी सरकारने उद्योगपती अनिल अंबानी यांचा 30 हजार कोटी रूपयांचा फायदा करून दिला हा आरोप अशाच असत्यांपैकी एक आहे, असे जावडेकर येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

पाकिस्तानस्थित जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसुद अजहर याची सुटका वाजपेयी सरकारच्या कार्यकाळात 1999 मध्ये करण्यात आली. त्यावरून कॉंग्रेसकडून भाजपवर निशाणा साधला जात आहे. त्याला प्रत्युत्तर देताना जावडेकर म्हणाले, विमानाचे अपहरण करून अपहरणकर्त्यांनी अजहरच्या सुटकेची मागणी लावून धरली. त्यावेळी विरोधी बाकांवर असणाऱ्या कॉंग्रेसने त्या विमानातील प्रवाशांच्या कुटूंबीयांच्या निदर्शनांसाठी पुढाकार घेतला होता. त्यावेळी सरकारने विरोधकांना विश्‍वासात घेतले होते. कॉंग्रेसकडून दुटप्पीपणाचे राजकारण केले जात आहे, असा प्रत्यारोपही त्यांनी केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)