भावाची पोलीस ठाण्यात फिर्याद : दोघांविरुद्ध गुन्हा
नगर – आईच्या नावे असलेल्या प्लॉटची परस्पर नावावर करून घेतल्याप्रकरणी दोन सख्ख्या भावांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नगर भूमापन अधिकारी कार्यालयात बनावट प्रतिज्ञापत्र तयार करण्यात आले होते.
मनोज कर्तारसिंग चावला, इंद्रजीत कर्तारसिंग चावला (दोघे रा. कृपाल कार्यालय, नगर) ही गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, मनोज व इंद्रजीत या दोघांनी त्यांचे तिसरे बंधू लवसागर चावला यांना कल्पना न देता परस्पर त्यांच्या आईच्या नावे असलेला प्लॉटबाबत नगर भूमापन अधिकारी कार्यालयात बनावट प्रतिज्ञापत्र तयार केले.
त्याआधारे मनोज व इंद्रजीत या दोघांनी स्वतःची नावे प्लॉटवर नोंद करून घेतली. या प्रकारापासून लवसागर यांना अंधारात ठेवले. याप्रकरणी लवसागर चावला यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात मनोज चावला, इंद्रजित चावला या दोन सख्या भावाविरुद्ध फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार केदार हे करीत आहेत.