कलंदर: पडघम निवडणुकीचे

उत्तम पिंगळे

विसरभोळे : या मतदार राजे आपले स्वागत आहे.
मी : आज एकदम मतदार राजा?
विसरभोळे : म्हणजे काय आता तुम्ही मतदार राजे नाही का? सर्वच पक्ष आपल्याला काय हवे नको ते विचारतील. काही नवीन काम करण्याचे ठोस आश्‍वासन देतील. म्हणजे आपण राजेच ना?
मी : निवडणूक जाहीर झाली म्हणून तुम्ही असे म्हणता आहात. आता निवडणूक होईपर्यंत आम्ही राजेच. बरोबर, मग पुढे काय?
विसरभोळे : पुढे तर तुम्ही नेहमीच पाहाता. प्रेमात, युद्धात सारे क्षम्य असतं, तेंच राजकारणातही! आता खरी रणधुमाळी सुरू होणार आहे. सर्वप्रथम आचारसंहिता लागू झाली. सरकार धोरणात्मक निर्णय घेऊ शकत नाही. म्हणजेच सध्याचे सरकार हे आता कामचलाऊ वा काळजीवाहू झाले आहे. आणि रणधुमाळी अशा करता म्हणत आहे. सर्वात मोठा प्रश्‍न तिकीट वाटपात होणार आहे व ते नेहमीचेच आहे. प्रथमतः असे दिसत आहे की सध्या तरी एनडीए सरकार व महागठबंधनाचा सामना होणार पण तिकीट वाटपात किंवा जागावाटपात गोंधळ झाला म्हणजे संपूर्ण पक्षच या आघाडीतून त्या आघाडीत जाऊ शकतो किंवा स्वतंत्र लढू शकतो. अजून तरी तिसरी आघाडी दिसत नाही पण काही सांगता येत नाही.
मी : पण सरकार गटातील वरिष्ठ सांगताहेत की सध्याच्या खासदारांतील बऱ्याच जणांचा पत्ता कट होणार आहे.
विसरभोळे : म्हणूनच मी रणधुमाळी म्हणत आहे. आता पूर्वी सारखे राहीले नाही. तुम्ही कितीही म्हणा बहुतेक पक्षात घराणेशाही आहे. हं काही पक्षात जास्त किंवा काही मध्ये कमी पण घराणेशाही आहेच. याचे तिकीट कापले जाईल तो त्याच्याऐवजी त्याच्या पत्नीला वा मुलास उमेदवारी मिळण्यास प्रयत्न करेल. पक्षाने तिकीट नाकारल्यास एखाद्यास तेवढे अवसान नसेल तर तो गप्पही राहील. पण हे प्रमाण अत्यल्प असणार आहे. स्वतः तिकीट मिळाले नाही किंवा आपल्या नातेवाईकासही मिळाले नाही तर तो थेट बंडखोरी करू शकतो आणि कोणत्याही पक्षात बंडखोरी म्हणजे विरोधकास जिंकण्याचे आयते कोलित असते. मग त्याला मनवणे किंवा तो थेट दुसऱ्या पक्षातून उमेदवारी घेऊ शकतो, असं चालूच राहणार आहे.
वेगवेगळ्या राज्यांतील परिस्थिती वेगवेगळी असू शकते तिकीट मिळणार नाही हे आधीच समजताच एक जाहीर पत्रकार परिषद घेऊन पक्षात कशी माझी घुसमट होती, माझे ऐकले जात नव्हते हा सूर काढला जाईल. कुणाचा आतला आवाज कधी बाहेर पडेल हे सांगता येत नाही. अशा परिषदेत थेट पक्ष बदलून दुसऱ्या गटात सामील होऊन त्यास अधिकृत तिकीटही मिळते. हे असे चालूच राहणार आहे.
मी : मग पक्ष कार्यकर्त्यांचे काय? तसेच निष्ठावंतांचे काय?
विसरभोळे : पक्षाची तत्त्वे पक्षनिष्ठा हे सारे या रणकंदनात बाजूला पडते. मग निवडून येण्याची शक्‍यता जास्त त्यास तिकीट दिले जाते. मग तो सध्याचा खासदार असो किंवा दुसरा नेता असो किंवा विरोधकांकडून नाराज झालेला नेता असो. सत्तेचा मोह कोणाला नाही? म्हणूनच निवडून येण्याची शक्‍यता जास्त त्याला तिकीट दिले जाते. कार्यकर्त्यांना उपदेशाचे डोस पाजले जातील की यावेळी अटीतटीची निवडणूक आहे म्हणून जोमाने कामाला लागा. तुम्हाला माहीत आहेच की आलीकडे निवडणुकीत आचाट पैसा लागतो व सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडे तो असण्याची शक्‍यता सुतराम नाही.तुम्हाला ते अजब तुझे सरकार गाणे आठवते का? तसचं
निष्ठावंतांच्या गळ्यात धोंडा…
बंडखोरा तिकिटाचा ‘हार’
अजब तुझे सरकार…

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)