शेतकऱ्यांबद्दल संवेदनशील दाखवून कर्ज पुरवठा करा! – मुख्यमंत्र्यांचे बॅंकांना निर्देश

राज्याच्या 4 लाख कोटींच्या वार्षिक पतपुरवठा आराखड्यास मंजुरी

मुंबई (प्रतिनिधी) – राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची बॅंकांनी अंमलबजावणी करणे अपेक्षीत आहे. ही बैठक केवळ औपचारीकता नाही याची जाणीव ठेवावी, असा दम भरतानाच शेती आणि शेतकऱ्यांबद्दल संवेदनशीलता दाखवत बॅंकांनी पतपुरवठा करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या बैठकीत दिले. दरम्यान, यावेळी राज्याच्या 4 लाख 24 हजार 29 कोटी रुपयांच्या वार्षिक पतपुरवठा आराखड्यास मंजुरी देण्यात आली.

सह्याद्री अतिथीगृह येथे आज झालेल्या बैठकीस कृषिमंत्री चंद्रकांत पाटील, वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर, महाराष्ट्र बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक राजीव यांच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सन 2019-20 साठीच्या मंजूर केलेल्या 4 लाख 24 हजार 29 कोटी रुपयांच्या एकूण वार्षिक पतपुरवठा आराखड्यात कृषिक्षेत्रासाठी 87 हजार 322 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. बैठकीस राज्य प्रशासनातील विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, विविध राष्ट्रीयकृत बॅकांचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जास्तीत जास्त पीक कर्जाचे वाटप करा
बॅंकांच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना चांगली वागणूक द्यावी. कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी जेणे करून शेतकऱ्यांना पीक कर्ज घेताना अडचणी येणार नाहीत. बॅंकांचे पीक कर्जाचे उद्दीष्ट आणि साध्य यात तफावत असू नये. शेतकऱ्यांप्रति असणारी भावना बॅंकांनी बदलणे गरजेचे आहे. असे स्पष्ट करतानाच जास्तीत जास्त पीक कर्जाचे वाटप झाले पाहिजे. राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या बैठकीतील निर्णयांची माहिती ग्रामीण भागातील बॅंकांच्या शाखांपर्यंत पोहोचावेत यासाठी प्लॅटफॉर्म तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

गेल्या वर्षीच्या पीक कर्जाच्या उद्दीष्टपूर्तीची आकडेवारी पाहून मुख्यमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. एकूण उद्दीष्टाच्या केवळ 54 टक्केच साध्य झाले ही गंभीर बाब असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, केवळ सादरीकरणासाठी राज्यस्तरीय बॅंकर्स समितीची बैठक नाही. या बैठकीत जे निर्णय घेतले जातात ते बॅंकांनी त्यांच्या क्षेत्रीय स्तरावरील शाखांपर्यंत पोहोचवले पाहिजे. बॅंकांनी शेती आणि शेतकऱ्यांबद्दल संवेदनशीलता दाखवावी. उद्दीष्टपूर्तीसाठी जबाबदारी निश्‍चित करावी.

क्षेत्रियस्तरावर होणाऱ्या बैठकांना बॅंकांनी वरीष्ठ अधिकारी पाठवून आहे त्याच ठिकाणी अडचणींवर मार्ग काढावेत. शेतकऱ्यांच्या तक्रारींचा निपटारा स्थानिकस्तरावरच झाला तर त्यांना दिलासा मिळेल. कर्मचाऱ्यांची संख्या वाढवितानाच जून-जुलै महिन्यात अतिरीक्त कर्मचारी नेमून पीक कर्ज वेळेवर मिळण्याची व्यवस्था करावी, असे मत कृषीमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)