फडणवीस-पवार हे दोघेही जातीयवादी : प्रकाश आंबेडकर

सोलापूर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दोघेही ही धर्मवादी आणि जातीयवादी आहे, अशी टीका वंचित बहुजन समाज आघाडीचे नेते व सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी केली. बसपाचे गटनेते आनंद चंदनशिवे यांच्या घरी सदिच्छा भेटीप्रसंगी पत्रकारांशी ते बोलत होते.

आंबेडकर म्हणाले, उजनीच्या पाण्याचे आणखी नियोजन होणे गरजेचे आहे. कोयना आणि उजनी धरणातून जे अतिरिक्त पाणी पुढे जाते, ते रोखण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. तरच या जिल्ह्यातील सिंचनाची क्षमता आणखी वाढेल. यासाठी मी सोलापूरची दुष्काळी परिस्थिती निवारण करण्यासाठी प्रयत्नशील असेन, असेही त्यांनी सांगितले. त्याच सोबत अर्धवट असलेल्या जलसिंचनाची कामे पूर्ण केली जाण्याचा मनोदय व्यक्त केला.

सांगली शहर पाण्याखाली येऊ नये म्हणून आलमट्टी धरण पूर्णक्षमतेने भरले जाते. उजनीमधूनसुद्धा अतिरिक्त पाणी पुढेच जाते. हे कितीदिवस चालणार. एकीकडे जिल्ह्यात दुष्काळ आणि दुसरीकडे पाणी वाया जाते, असे चित्र आहे. ते बदलणे गरजेचे आहे. सोलापूरच्या आजवरच्या राज्यकर्त्यांनी नियोजनबध्द विकासाला प्राधान्य दिले नाही, असा आरोपही आंबेडकर यांनी केला.

दरम्यान, ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी आंबेडकरी चळवळीतील विविध पक्षांमध्ये असलेल्या लोकांची मोट बांधण्याचे काम सुरू केले आहे. त्यास सोलापुरातील शहर परिसरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. एमआयएम व बसपचे नगरसेवकांचा उस्फूर्त प्रतिसाद त्यांनी मिळवला आहे. बसपचे लोकसभेच्या उमेदवाराने उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आंबेडकरांचे मताधिक्‍य नक्कीच वाढेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)