नवी दिल्ली- ट्रम्प प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या नव्या निर्देशांनुसार आता अमेरिकी व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांना गेल्या पाच वर्षांतील सोशल मीडियावरील तपशील देणे अनिवार्य ठरणार आहे. त्यामुळे आता तुम्हाला व्हिसाचा अर्ज करायचा असेल तर त्या अर्जासोबतच तुम्हाला तुमचे सोशल मीडियावरील तपशीलही उघड करावे लागणार आहेत. अमेरिकेत येऊ इच्छिणाऱ्या अन्य देशांतील नागरिकांच्या वर्तणुकीचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेकडून नव्याने लागू करण्यात येणाऱ्या व्हिसा संबंधित “डी 160′ आणि “डी 260′ हे अर्ज भरताना सोशल मीडियाची माहिती द्यावी लागणार आहे. यावेळी गेल्या पाच वर्षांत वापर करण्यात आलेल्या किमान 20 सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामध्ये फेसबुक, फ्लिकर, गुगल प्लस, ट्विटर, लिंक्डइन, यूट्युब आदींचा समावेश करण्यात आला आहे.
या शिवाय संबंधित अर्जदाराने गेल्या पाच महिन्यांमध्ये वापरलेला ई-मेल आयडी आणि फोन नंबरचेही सर्व तपशील देणे बंधनकारक करण्यात आले आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये अशाप्रकारचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी आता करण्यात येणार आहे.