उद्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शक्‍यता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेतल्यानंतर राज्यातील बहुप्रतीक्षित राज्य मंत्रिमंडळाचा विस्ताराची पुन्हा चर्चा सुरू झाली. या भेटीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याचे समजते. फडणवीस हे शनिवारी नीती आयोगाच्या बैठकीसाठी दिल्लीला जाणार आहेत. या बैठकीनिमित्त ते पक्षाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेणार आहेत. पक्षाध्यक्षांच्या मंजूरीनंतर रविवारी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्‍यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवार, 17 जूनपासून सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमिवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतल्याचे बोलले जाते. मात्र, पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यापार्श्‍वभूमिवर मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी राज्यपालांची घेतलेली भेट महत्त्वाची मानली जाते. राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चा सुरू आहे. कॉंग्रेसमधून भाजपमध्ये येत असलेले विखे-पाटील, विजयसिंह मोहिते-पाटील, अब्दुल सत्तार हे मंत्रिमंडळ विस्तारात पद मिळण्याबाबत आशावादी आहेत, मात्र आता दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी हिरवा कंदील दाखवला, तर रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो, असे सुत्राचे म्हणणे आहे.

कॉंग्रेस-राष्ट्रवादीतून आयात नेत्यांना प्राधान्य मिळत असल्याने दोन्ही पक्षांत अंतर्गत कलह सुरू झाल्याचे बोलले जाते आहे. विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या राधाकृष्ण विखेंना महसूल किंवा सार्वजनिक बांधकाम खात्याची अपेक्षा आहे, पण भाजप त्यांना कृषी खाते देण्यावर आग्रही आहे, तर विजयसिंह मोहिते-पाटलांना कुठले खाते द्यायचे, यावर अजूनही खल सुरू आहे. मंत्रिमंडळ विस्तारावरून शिवसेनेतही अंतर्गत कलह सुरू आहे. मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद मिळण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. यासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाईंच्या नावाची चर्चा आहे, पण यावरून सेनेत नाराजी आहे. लोकांमधून निवडून आलेल्या आमदारांना डावलून, मागच्या दाराने आलेल्या विधान परिषद सदस्यांना मंत्रिपद देण्यात येत असल्याने शिवसेना आमदारांमध्ये असंतोष असल्याचे बोलले जाते आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)