“आरटीई’ प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतवाढ द्या

विविध संघटनांची शिक्षण विभागाकडे मागणी ः प्रशासनाच्या निर्णयाकडे लक्ष
प्राथमिक शिक्षण संचालक चौहान यांना निवेदन सादर

पुणे – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार “आरटीई’ अंतर्गतच्या 25 टक्के प्रवेशासाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी पालक संघासह इतर विविध संघटनांकडून शिक्षण विभागाकडे करण्यात येऊ लागली आहे.
राज्यातील 9 हजार 195 शाळांमध्ये 1 लाख 16 हजार 779 प्रवेशाच्या जागा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. यासाठी 2 लाख 44 हजार 933 ऑनलाईन अर्ज दाखल झाले आहेत.

राज्यस्तरीय सोडतीद्वारे 67 हजार 706 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहिर झाले आहेत. प्रवेश जाहीर झालेल्या पालकांना शाळांमध्ये मुलांना प्रवेश घेण्यासाठी 26 एप्रिलची मुदत देण्यात आली आहे. आत्तापर्यंत केवळ 18 हजार पालकांनीच मुलांचे शाळांमध्ये प्रवेश घेतले आहेत. प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पालकांना आणखी काही दिवसांचा कालावधी लागणार आहे. सलग आलेल्या सुट्टयांमुळे शाळा बंद असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीच्या कामात कर्मचारी व्यस्त असल्यामुळे “आरटीई’ प्रवेश प्रक्रियेवर परिणाम होत आहे.

पुणे जिल्ह्यात 20 ब्लॉकच्या ठिकाणी पडताळणी समित्या नियुक्‍त्या करण्यात आलेल्या आहेत. या प्रत्येक समितीमध्ये किमान 20 अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र यातील सर्वच्या सर्व अधिकारी, सदस्य नियमितपणे पडताळणीसाठी उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारी पालकांकडून येऊ लागल्या आहेत. कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी फार वेळ लागत असल्याने पालकांना त्रास सहन करावा लागतो आहे. ही मुदत 5 मे पर्यंत वाढवण्याची मागणी समाजवादी अध्यापक सभेचे संघटक डॉ. शरद जावडेकर, 25 टक्के आरक्षण पालक संघाच्या अध्यक्ष सुरेखा खरे यांनी शिक्षण संचालक सुनील चौहान यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

अधिकारी म्हणतात…

पालकांकडून शाळा, पडताळणी समितीबाबत शिक्षण विभागाकडे बऱ्याचशा तक्रारी दाखल करण्यात येऊ लागल्या आहेत. पालकांच्या व संघटनाच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीची दखल घेऊन त्वरित योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे. मुदतीत काही पालकांना प्रवेश प्रक्रिया पूर्ण न करता आल्यास आणखी काही दिवसांसाठी मुदत देण्याबाबत निश्‍चित विचार करण्यात येणार असल्याचेही जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)