चीनमध्ये रसायनांच्या कारखान्यात स्फोट; 6 ठार 30 जखमी

बिजींग- चीनच्या पूर्व भागातील औद्योगिक पट्टयामध्ये एका खतांच्या फॅक्‍टरीत झालेल्या प्रचंड स्फोटामध्ये किमान 6 जणांचा मृत्यू झाला तर 30 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. या स्फोटामुळे या फॅक्‍टरीची इमारत पूर्णपणे जमिनदोस्त झाली आहे, असे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. जियांग्सू प्रांतातील यांचेंग या उद्योग वसाहतीतल्या खतांच्या फॅक्‍टरीत दुपारी 2.48 वाजण्याच्या सुमारास आग लागली. त्यानंतर हा स्फोट झाला.

या स्फोटामुळे भूकंप झाल्याप्रमाणे मोठा हादरा बसला आणि इमारत पडली. त्यामुळे काही कामगार इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकून पडले, असे काही प्रत्यक्ष साक्षीदारांनी सांगितले. स्फोटामुळे आजूबाजूच्या रहिवासी इमारतींची काचेची तावदानेही फुटली.

स्फोटामुळे लागलेली आग विझवण्यासाठी आणि अडकलेल्यांना सोडवण्यासाठी अग्निशामक दलाचे तब्बल 86 बंब कार्यरत होते. इमारतीखाली अडकलेल्यांना सोडवण्याचे काम लगेच सुरू करण्यात आले असून आतापर्यंत 12 जणांना वाचवण्यात यश आले असल्याचे शिन्हुआ या सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे.

हा स्फोट करखान्यातील बेन्झेन रसायनामुळे झाला असल्याचा अंदाज आहे. या खतांच्या कारखान्यापासून जवळच 10 शाळा आहेत. त्यामुळे मोठी दुर्घटना घडू शकली असती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)