वर्ध्यात बॉम्ब निकामी करताना स्फोट 

कर्मचा-यासह सहा जणांचा मृत्यू; चौघांची प्रकृती गंभीर 

वर्धा: वर्धा जिल्ह्यातील सोनेगाव (आबाजी) परिसरात बॉम्ब निकामी करताना भीषण स्फोट झाला. या स्फोटात सहा जणांचा मृत्यू, तर दहा जण जखमी झाले आहेत. जखमींना सावंगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून चौघांची प्रकृती गंभीर आहे. हे ठिकाण पुलगावमधील दारुगोळा भांडारापासून आठ किमी अंतरावर आहे.

चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती – सुधीर मुनगंटीवार 
या प्रकरणी अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. तसेच उच्चस्तरीय समिती गठित करुन चौकशी केली जाईल. याशिवाय पैसे वाचवण्यासाठी सुरक्षेत काही तडजोड केली आहे का, याचाही तपास केला जाईल, अशी माहिती राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. 

राजकुमार बाहुते, प्रभाकर वानखेडे, नारायण कचरे, प्रवीण मुंजेवार, विलास पाचरे, उदयवीर सिंह अशी मृतांची नावे आहेत. ही दुर्घटना आज सकाळी सात वाजून 10 मिनिटांनी घडली. जबलपूर खामरिया ऑर्डिनन्स फॅक्‍टरीमधील कर्मचाऱ्यांना जुने आणि वापरात नसलेले बॉम्ब निकामी करण्यासाठी बोलवण्यात आले होते. यावेळी 23 एमएम स्फोटके चुकीच्या पद्धतीने हाताळली गेल्याने स्फोट झाल्याचे म्हटले जात आहे. यामध्ये खामरिया ऑर्डिनन्स फॅक्‍टरीच्या कर्मचाऱ्यासह सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली. घटनास्थळी प्रशासन, लष्करी अधिकारी दाखल झाले आहेत.

ठेकेदार आणि लष्करी अधिकाऱ्यांच्या गोरखधंद्यामुळे ही घटना घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्यांच्या आरोपानुसार, “पुलगावच्या ठेकेदारांनी मिलिट्रीमधील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरुन गेल्या चार-पाच वर्षांपासून गोरखधंदा सुरु केला आहे. जे काम लष्करातील कर्मचाऱ्यांनी करायला हवे, ते काम गावातील लोकांकडून करुन घेतले जात आहे, अशा आरोप त्यांनी केला आहे. या दुर्घटनेत आज ज्यांचा बळी गेला आहेत त्यासाठी ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

दरम्यान, पुलगाव दारुगोळा भांडार हे भारतीय लष्कराच्या सर्वात मोठ्या दारुगोळा भांडारापैकी एक आहे. तर आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे दारुगोळा भांडार आहे. दारुगोळा भांडाराचा हा परिसर तब्बल 28 किमीमध्ये पसरला आहे. पुलगावमध्ये दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 2016 मध्ये स्फोट होऊन आग लागली होती, ज्यात 16 जवान शहीद झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)