माहिती अधिकारातून उघड
परदेशी प्रवासांवर झाला सर्वाधिक खर्च
मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मंत्री आणि राज्यमंत्र्यांनी मागील 5 वर्षांत मोठ्या प्रमाणात परदेशी आणि देशातंर्गत प्रवास केला. या प्रवासावर एकूण 393 कोटी 57 लाख 51 हजार 890 रुपये खर्च झाल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना कॅबिनेट अफेअर्सच्या वेतन आणि खाते विभागाने दिली. सर्वाधिक खर्च परदेशी प्रवासांवर झाला असून त्यावर झालेल्या एकूण खर्चाची रक्कम 292 कोटी, तर देशातंर्गत प्रवासांवर 110 कोटी खर्च झाला आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्व मंत्री आणि राज्यमंत्र्यांच्या गेल्या 5 वर्षातील परदेशी आणि देशातंर्गत प्रवासांवर झालेल्या एकूण खर्चाची माहिती मागितली होती. कॅबिनेट अफेअर्सच्या वेतन आणि खाते विभागाचे वरिष्ठ लेखा अधिकारी सतीश गोयल यांनी अनिल गलगली यांना ई-लेखाच्या आधारावर त्या कार्यालयाच्या अभिलेखावर उपलब्ध वर्ष 2014-2015 पासून वर्ष 2018-2019 या 5 वर्षात परदेशी आणि देशातंर्गत प्रवासांवर झालेल्या एकूण खर्चाची आकडेवारी दिली.
यामध्ये कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांच्या परदेशी आणि देशातंर्गत प्रवासांवर झालेल्या खर्चाचा समावेश आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदीसह कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांच्या नावाचा उल्लेख नाही. गेल्या 5 वर्षात कॅबिनेट मंत्र्यांच्या परदेश प्रवासांवर एकूण 262 कोटी 83 लाख 10 हजार 685 रुपये खर्च, तर देशातंर्गत प्रवासांवर एकूण 48 कोटी 53 लाख 9 हजार 584 रुपये खर्च झाले आहेत. राज्यमंत्र्यांच्या परदेश प्रवासांवर 29 कोटी 12 लाख 5 हजार 170 रुपये, तर देशातंर्गत प्रवासांवर 53 कोटी 9 लाख 26 हजार 451 रुपये खर्च झाले आहेत.