पाटणा – बिहार सरकारमध्ये मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या अनेक नेत्यांनी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुका जिंकल्याने, त्यांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज राजभवनात हजेरी लावत बिहारचे राज्यपाल लाल तंडण यांची भेट घेतली आहे. नितीश कुमार आणि राज्यपालांमध्ये झालेल्या या बैठकीनंतर माध्यमांमध्ये सध्या बिहार कॅबिनेटचा विस्तार उद्या म्हणजेच रविवारी होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
२०१९ लोकसभा निवडणुकांमध्ये विजय संपादित केल्यामुळे बिहार विधानसभेत मंत्रिपद भूषवत असलेले, लालन सिंह, पशुपती पारस आणि दिनेश चंद्र यादव आता लोकसभेचे खासदार झाले असून त्यांची विधानसभेतील पदं रिक्त झाली आहेत. बिहार विधानसभेतील रिक्त झालेली ही पदं भरण्यासाठी बिहार मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार असल्याचं वृत्त आहे. माध्यमांमध्ये वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार नवेराज कुमार, रंजू गीता, अशोक चौधरी आणि लालन पासवान या नव्या चेहऱ्यांना नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळण्याची चिन्हं आहेत.
तत्पूर्वी, जनता दल युनायटेडचे सर्वेसर्वा तथा बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात जेडीयुला केवळ एकच मंत्रिपद देण्याचा भाजपतर्फे ठेवण्यात आलेला प्रस्ताव फेटाळला होता. आपल्या निर्णयाबाबत माहिती देताना ते म्हणाले होते की, “नव्या मंत्रिमंडळात आम्हाला केवळ एकच जागा देणं म्हणजे आमचा नव्या सरकारमध्ये केवळ प्रतीकात्मक सहभाग असल्यासारखे होईल. त्यामुळे आम्ही त्यांना हे मंत्रिपद स्वीकारत नसल्याचं सांगितलं आहे. ही काही मोठी गोष्ट नसून आम्ही आजही पूर्णपणे एनडीएमध्येच आहोत आणि यापुढेही आम्ही एकत्रच काम करणार आहोत, यामध्ये कोणतीही शंका बाळगण्याचे कारण नाही.”
दरम्यान, बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडची भाजपसोबत युती असून ते सध्या बिहारमध्ये सत्तेत आहेत. भाजप व जेडीयुने नुकतीच पार पडलेली लोकसभा निवडणूक देखील एकत्र लढवली असून यामध्ये त्यांनी घवघवीत यश देखील संपादित केलं आहे. बिहारमध्ये भाजपला सर्वाधिक १७ तर जेडी(यु)ला १६ जागांवर यश मिळालं आहे.
Bihar Chief Minister Nitish Kumar met Governor Lal Ji Tandon today. Bihar cabinet to be expanded tomorrow, four new ministers to take oath of office. (file pic) pic.twitter.com/WLq9UKJk6p
— ANI (@ANI) June 1, 2019