जीवनगाणे: पसरलेला डिस्प्ले…

अरुण गोखले

“सुमन तू बसं हं , मी तुझ्यासाठी मस्तपैकी कॉफी करून आणते,’ असं म्हणत मीनाताई आतल्या खोलीत गेल्या.
सुमनची नजर त्यांच्या त्या आलिशान हॉलमध्ये भिरभिरत सौंदर्याचा आस्वाद घेऊ लागली. ती भिंतीची रंग संगती, सिलिंगचा पंखा, लाईटचे झुंबर, देखणी शोकेस, भारी सोफा सारं कसं अगदी सुखावणार. पाहता पाहता तिचे लक्ष शेजारच्या खोलीकडे गेलं. कुतुहलाने ती खोलीत डोकावली तर काय! तिथे एक भलं मोठं टेबल मधोमध मांडलेलं. त्यावर वह्या, पुस्तकं, कॉमिक्‍स बुक्‍स, रंगपेट्या, पेट्या, पेन्सिली, खडू आणि बरचं काही, पण सारं कसं? तर इतस्तत: पसरलेलं आणि उघडं.

सुमननं ते पसरलेलं टेबल पाहिलं आणि तिला लहानपणी आईने दिलेला टापटिपीचा धडा आठवला. सुमननेही तोच धडा आपल्या जीवनात गिरवला होता. तिला काही पसरलेलं, इकडे तिकडे पडलेलं आवडतही नव्हतं, अन्‌ खपतही नव्हतं. म्हणूनच त्या टेबलावरचा पसारा आवरण्यासाठी ती पुढे होणार इतक्‍यात मीनाताई कॉफीचे मग घेऊन आल्या. त्या म्हणाल्या, “थांब! तो पसारा आवरू नकोस, तो तसाच राहू दे.’
“का तसाच का?’ तिने विचारले. तेव्हा मीनाताई एकीकडे कॉफी घेत घेत त्या तिला सांगू लागल्या. “सुमन, ते पसरलेलं माझं टेबल म्हणजे एक ओपन डिस्प्ले आहे ज्ञानाचा.’
“म्हणजे? मी नाही समजले?’ सुमनने विचारले.
तेव्हा त्या म्हणाल्या “सुमन, त्याचं काय आहे. आता चार वाजले ना की त्या समोरच्या बिल्डींगमध्ये काम चाललेल्या कामगारांची काही मुलं इथं येतात. या टेबलाभोवती बसतात. ज्यांना वाचता येतं ते वाचतात. काही जण चित्रं काढतात. कोणी रंगीत खडू पेन्सिलीशी मैत्री करतात. त्यांच्यासाठी मी सर्वकाही खुले करून ठेवलं आहे. माझ्यापरीने मी ही ज्ञानाची दारे त्यांच्यासाठी उघडून ठेवली आहेत. त्यांनी लिहावं, वाचावं, पुस्तकं हाताळावं, चित्रे पाहून, ऐकून शिकावं, म्हणून हा खटाटोप. आता तो कुणाला आवडो वा नावडा, मला त्यात एक वेगळाच आनंद आहे.
तेवढ्यात “मावशी… आम्ही आलो… असं म्हणत दहा-बारा पोरंपोरी आल्या. त्यांनी त्या टेबलाभोवती बैठक मारली. चला! आता आपण हॉलमध्ये बसू या. असं म्हणत मीनाताईंनी तिला हॉलमध्ये आणले खरे, पण तिच्या नजरेपुढून ते पसरलेलं डिस्प्ले टेबल जात नव्हतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)