मध्य प्रदेश, राजस्थानात भाजपची एक्झिट?

-विविध एक्सिट पोल्सचा अंदाज -तेलंगणात टीआरएस वरचढ

नवी दिल्ली –
मध्यप्रदेश आणि छत्तिसगढ राज्यांची सत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि कॉंग्रेसमध्ये टाईट फाईट होण्याची शक्‍यता आहे. राजस्थानमध्ये कॉंग्रेसचे पारडे जड आहे. तर, तेलंगणात पुन्हा केसीआर यांचाच बोलबाला राहण्याची चिन्हे आहेत, असा अंदाज मतदानोत्तर चाचण्यांनी वर्तवला आहे.

राजस्थान आणि तेलंगण या राज्यांत शुक्रवारी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. ती प्रक्रिया पार पडताच चार राज्यांसाठीचे मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले. त्यानुसार, मध्यप्रदेश, छत्तिसगढ आणि राजस्थान या तीन राज्यांमध्ये सत्तेवर असणाऱ्या भाजपला सत्ता राखण्यासाठी झगडावे लागणार असल्याचे चित्र समोर आले. मध्यप्रदेशात विधानसभेच्या एकूण 230 जागा आहेत. त्या राज्यातील सत्ता कुणाला मिळणार याबाबत मतदानोत्तर चाचण्यांमध्ये एकमत नसल्याचे स्पष्ट झाले.

-Ads-

रिपब्लिक टीव्ही-जन की बात चाचणीनुसार भाजपला 108 ते 128 तर कॉंग्रेसला 95 ते 115 जागा मिळतील. इंडिया टुडे-ऍक्‍सिसच्या अंदाजानुसार भाजपला 102 ते 120 आणि कॉंग्रेसला 104 ते 122 यांच्या दरम्यान जागा मिळण्याची शक्‍यता आहे. टाईम्स नाऊ-सीएनएक्‍सने भाजपला स्पष्ट बहुमत जागा दाखवताना 126 जागा मिळण्याचे भाकीत केले आहे. त्या चाचणीनुसार कॉंग्रेसला 89 जागा मिळतील. त्याउलट, एबीपी न्युजने कॉंग्रेसला (126 जागा) बहुमत मिळेल आणि भाजपला 94 जागांवर समाधान मानावे लागेल, असे म्हटले आहे.

छत्तिसगढमध्ये विधानसभेच्या 90 जागा आहेत. त्या राज्यात भाजपला 35 ते 43 तर कॉंग्रेसला 40 ते 50 जागा मिळतील, असे रिपब्लिक-सी व्होटरने म्हटले आहे. न्युज नेशननुसार भाजपला 38 ते 42 तर कॉंग्रेसला 40 ते 44 दरम्यान जागा मिळण्याची शक्‍यता आहे. टाईम्स नाऊ-सीएनएक्‍सने भाजपच्या पदरात साधे बहुमत (46 जागा) टाकले आहे. त्या चाचणीने कॉंग्रेसला 35 जागा दाखवल्या आहेत.

भाजपला 52 तर कॉंग्रेसला 35 जागा मिळतील, असे एबीपी न्युजला वाटते. मात्र, कॉंग्रेस 55 ते 65 या दरम्यान जागा मिळवून भाजपची (21 ते 31 जागा) पंधरा वर्षांची सत्ता संपुष्टात आणेल, असे भाकीत इंडिया टुडे-ऍक्‍सिसने केले आहे. माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांच्या नेतृत्वाखालील जनता कॉंग्रेस छत्तिसगढ (जोगी) आणि बसप युतीला 3 ते 8 जागा दाखवण्यात आल्या आहेत. छत्तिसगढमध्ये त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यास ती युती किंगमेकर ठरण्याची शक्‍यता आहे.

मध्यप्रदेश आणि छत्तिसगढबाबत मतदानोत्तर चाचण्यांमध्ये मतभिन्नता असली तरी राजस्थानबाबत त्यांच्यात बऱ्याच प्रमाणात एकवाक्‍यता आहे. बहुतांश चाचण्यांनी विधानसभेच्या 200 जागा असणाऱ्या राजस्थानात कॉंग्रेसचे सत्तेवर परतण्याचे भाकीत केले आहे.

राजस्थानात कॉंग्रेसला 119 ते 141 तर भाजपला 55 ते 72 जागा मिळतील, असे इंडिया टुडे-ऍक्‍सिसला वाटते. टाईम्स नाऊ-सीएनएक्‍सने कॉंग्रेसला 105 तर भाजपला 85 जागा दाखवल्या आहेत. त्या राज्यात भाजप आणि कॉंग्रेसमध्ये कॉंटे की टक्कर होईल, असे रिपब्लिक टीव्ही-जन की बातला वाटते. त्या चाचणीनुसार, भाजपला 83 ते 103 तर कॉंग्रेसला 81 ते 101 जागा मिळतील.

तेलंगणमध्ये काळजीवाहू मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्या नेतृत्वाखालील तेलंगण राष्ट्र समिती (टीआरएस) सत्ता राखेल, असा निष्कर्ष बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांनी काढला आहे. तेलंगणमध्ये विधानसभेच्या एकूण 119 जागा आहेत. टीआरएसला 50 ते 65 आणि 66 जागा मिळतील, असे अनुक्रमे रिपब्लिक टीव्ही आणि टाईम्स नाऊला वाटते.

टीव्ही9 तेलगू आणि इंडिया टुडेने त्या पक्षाला अनुक्रमे 75 ते 85 आणि 75 ते 91 जागा दाखवल्या आहेत. काही चाचण्यांनी टीआरएस आणि कॉंग्रेस-टीडीपी आघाडीमध्ये सत्तेसाठी जोरदार रस्सीखेच होण्याचे भाकित वर्तवले आहे. मिझोराम राज्यातही याआधीच मतदानाची प्रक्रिया पार पडली. आता पाचही राज्यांचे निकाल 11 डिसेंबरला जाहीर होणार आहेत. त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष त्या दिवसाकडे लागणार आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)