युती-आघाडीमुळे छोट्या पक्षांच्या नशिबी वनवास 

रिपाइं, शेकाप व रासपला निवडणूकीत जागा नाही

मुंबई – यंदाची लोकसभा निवडणूक शिवसेना-भाजपाची युती व कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महाआघाडीसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. प्रतिष्ठेमुळे युती आणि महाआघाडीने जास्तीत जास्त लोकसभेच्या जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. मात्र, युती व आघाडीच्या राजकारणाचा फटका छोट्या पक्षांना बसला असून त्यांना जागा सोडण्यास नकार दिल्याने रिपाइं, शेकाप, रयत क्रांती संघटना व रासपच्या नशिबी वनवास आला आहे.

शिवसेना-भाजपाच्या युतीमध्ये रिपाइं, रासप व रयत क्रांती संघटना, तर कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीमध्ये शेकाप या छोट्या पक्षांचा समावेश आहे. या घटक पक्षांनी आगामी लोकसभा निवडणूकीसाठी जागांची मागणी केली होती. मात्र, भाजपाने या घटक पक्षांना लोकसभेऐवजी विधानसभेच्या जागांचे आश्वासन दिले आहे. या आश्वासनावर विश्वास ठेवून छोटे पक्ष या निवडणुकीत भाजपचे पाठिराखे म्हणून वावरत असून यंदाच्या निवडणुकीत छोटे पक्ष अस्तित्वहीन ठरले आहेत.

रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले हे 1996 पासून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. 1998मध्ये दक्षिण-मध्य मुंबईतून निवडून आल्यानंतर आठवले यांनी 1999 आणि 2004 ची निवडणूक पंढरपूरमधून लढवली. 2009च्या लोकसभा निवडणुकीत शिर्डीत पराभव झाल्यानंतर आठवले शिवसेना-भाजपच्या गोटात दाखल झाले. 2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने आठवलेंच्या गळ्यात सातारची जागा मारली होती. यावेळी आठवले यांनी दक्षिण-मुंबई किंवा ईशान्यन्मुंबईच्या जागेची मागणी केली होती. मात्र, भाजपने लोकसभेचा एकही मतदारसंघ देण्यास नकार दिल्याने आठवलेंना माघार घ्यावी लागली.

धनगर समाजाचे नेते आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे 2009च्या लोकसभा निवडणुकीपासून भाजपसोबत आहेत. भाजपने त्यांना 2009मध्ये माढातून उमेदवारी दिली होती. त्यावेळी जानकर यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार शरद पवार यांच्यासमोर आव्हान उभे केले होते. तर गेली निवडणूक बारामतीतून लढताना जानकर यांनी राष्ट्रवादीच्या तोंडाला फेस आणला होता. यावेळी जानकर यांनी भाजपकडे लोकसभेच्या सहा जागांची मागणी केली होती. परंतु, भाजपने आठवलेंप्रमाणे जानकर यांचीही आश्वासनावर बोळवण केली.

खासदार राजू शेट्टी यांच्या शेतकरी संघटनेतून फुटून राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वतंत्र चूल मांडली. खोत यांनी रयत क्रांती संघटना नावाचा पक्ष स्थापन केला आहे. खोत यांना हातकणंगले जागा हवी होती. मात्र, भाजपनेही खोत यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या.

शेकाप प्रथमच निवडणूक रिंगणाबाहेर 
1948 साली स्थापन झालेल्या शेकापने पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून अर्थात 1952 पासून निवडणुका लढवल्या आहेत. या पक्षाचे महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात प्रबल्य होते. आता हा पक्ष रायगड आणि सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्‍यापुरती मर्यादीत झाला आहे. राज्यात शिवसेना-भाजपचा प्रभाव वाढल्यानंतर शेकापने काही काळ कॉंग्रेस-राष्ट्रवादीची सोबत केली. मात्र, आता शेकापने लोकसभेची एकही जागा न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शेकाप प्रथमच निवडणूक रिंगणाबाहेर राहणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)